बेळगाव लाईव्ह :सर्वसामान्य लोकांसाठी कधीही काहीही केले जात नाही याची प्रचिती सरकारच्या बेळगावमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने येऊ लागली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पुढील महिन्यात महनीय आणि अतिमहनीय व्यक्तींचे शहरात आगमन होणार आहे. या व्यक्तींच्या नजरेस आपण केलेली लाजिरवाणी निकृष्ट विकास कामे पडू नयेत यासाठी संबंधित खात्याकडून खटाटोप सुरू झाला आहे.
ताजे उदाहरण म्हणजे टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील डी मार्टच्या दिशेने जाणारा धोकादायक खड्डा पडून वाताहत झालेला रस्ता होय. गेले कित्येक महिने सदर धोकादायक खड्डा बुजवून या रस्त्याची दुरुस्ती केली जावी अशी वारंवार मागणी केली जात होती. मात्र संबंधित खात्याकडून जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. परिणामी वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना रेल्वे गेट समोर ओव्हर ब्रिजखालील या धोकादायक रस्त्यावरून ये -जा करताना मोठी कसरत करावी लागत होती.
सातत्याने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित खात्याला आता विधिमंडळाचे बेळगावातील अधिवेशन जवळ आल्यामुळे नाईलाजाने झोपेतून जागे होऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले आहे. सध्या दुरुस्तीसाठी आवश्यक दगड, माती वगैरे सदर रस्त्याच्या ठिकाणी ओव्हर ब्रिज खाली आणून टाकण्यात येत आहे.
कोणत्याही कारणास्तव असेना का, परंतु सदर रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने समाधान व्यक्त होत असले तरी दुसरीकडे सामान्य लोकांसाठी कधीही काहींही केले जात नाही, सर्व कांही फक्त अतिमहनीय लोकांसाठी आहे. आम्ही अनेक महिन्यांपासून या समस्यांशी झगडत आहोत. मात्र अचानक मंत्री, आमदार वगैरे भेटीला आले की काम सुरू होते.
वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांच्या बाबतीतील प्रशासनाची ही वर्तणूक लांच्छनास्पद आहे. त्यांनाच विशेष आदरातिथ्य का मिळावे? रस्ते वगैरे काहींही दुरुस्त करू नका, आम्ही दररोज ज्या अडथळ्यांचा सामना करतो त्या अडथळ्यांचा मंत्री, आमदारांना देखील अनुभव घेऊ द्या, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.