बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून राजस्थान मधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर फसवणूक केली असल्याची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी आज दिली.
तसेच या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) डाॅ. भीमाशंकर गुळद यांनी सांगितले की, एका बनावट फेसबुक अकाउंटद्वारे माझ्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांचे फर्निचर फक्त 90 हजार रुपयांमध्ये मिळवू शकता अशी जाहिरात देण्यात आली होती.
या जाहिरातीच्या माध्यमातून राजस्थानमधील व्यक्तीने लोकांची फसवणूक केली आहे. “तुम्ही एसपींचे मित्र आहात म्हणून तुम्हाला कमी किमती फर्निचर मिळेल” असे सांगून पैशाची मागणी केली जात होती.
हे फेक अर्थात बनावट फेसबुक अकाउंट केवळ माझ्या नावानेच नाही तर गदग आणि मंड्या जिल्ह्याच्या एसपींच्या नावेही तयार केले गेले आहे, अशी माहिती देऊन सोशल मीडियावर या पद्धतीचे संदेश अथवा जाहिरात आल्यास शहानिशा केल्याशिवाय कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी केले आहे.