बेळगाव लाईव्ह:बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीए रूद्रण्णा याच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात खडेबाजार पोलिसांनी “तहसीलदार ऑफिस व्हाट्सअप ग्रुप” मधील सर्वांची चौकशी सुरू केली आहे. काल शुक्रवारपासून या चौकशीला प्रारंभ झाला असून आज शनिवारपर्यंत 25 सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.
आत्महत्या करणाऱ्या रूद्रण्णा यडवण्णावर याचा मोबाईल जप्त करण्यात आल्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कचेरी अर्थात कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खडेबाजार पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. चौकशी वेळी तहसीलदार बसवराज नागराळ हे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते.
आता बेळगाव “तहसीलदार ऑफिस ऑल स्टाफ ग्रुप” मधील कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचीही चौकशी केली जात आहे. याच ग्रुपवर आत्महत्या करण्यापूर्वी एसडीए रुद्रण्णा याने 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:31 वाजता आपण आत्महत्या करून आपले जीवन संपवत असल्याचा मेसेज टाकला होता.
सदर स्टाफ ग्रुपमध्ये एकूण 106 कर्मचारी असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या कारणास्तवच प्रत्येक कर्मचाऱ्याला बोलावून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. एकेकाला बोलावून ही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, रुद्रण्णा याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिघा जणांनी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी अजून खडेबाजार पोलिसांना समन्स मिळालेले नाही. मात्र लवकरच समन्स मिळेल असे पोलीस सूत्राने सांगितले.
संशयीतांचा गेल्या चार दिवसांपासून शोध सुरू असून त्यांचे मोबाईल ‘स्विच ऑफ’ आहेत. तिघांचाही थांगपत्ता लागत नसल्यामुळे जबाब नोंदवणे आणि पुढील कारवाई हाती घेणे पोलिसांना शक्य झालेले नाही. तथापि आता अटकपूर्व जामिनासंदर्भात तिघांनी अर्ज दाखल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.