बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे येत्या 12 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत भरणाऱ्या श्री रेणुका देवी यात्रेच्या ठिकाणी आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना कोल्हापूरने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. दरवर्षी कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील श्री रेणुका देवी भक्त प्रचंड संख्येने सौंदत्ती येथील यात्रेसाठी भाड्याच्या परिवहन बसेस, खाजगी प्रवासी वाहने, वैयक्तिक वाहने आणि परिवहन मंडळाच्या बसेसने सौंदत्तीला येतात.
आता यावर्षी देखील येत्या 12 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या यात्रेसाठी कोल्हापूरचे भाविक सौंदत्तीला येणार आहेत. तेंव्हा त्यांच्यासाठी पुढील सुविधा उपलब्ध कराव्यात. भाविकांमध्ये महिला वर्ग जास्त असतो. शिवाय त्यांच्यासोबत जेवणखाणाचे साहित्य, राहण्यासाठी तंबू वगैरे साहित्य असल्यामुळे भाविकांना घेऊन येणाऱ्या वाहनांना निवासाच्या स्थानापर्यंत जाण्याची परवानगी मिळावी. खास व इतर साठीच्या प्रवेश शुल्काचा दर कमी करावा. दररोजचे पार्किंग आणि प्रवेश कराचा दर माफक असावा प्रवेश आणि पार्किंग शुल्क दर्शवणारे फलक मोठ्या इंग्रजी शब्दांमध्ये असावेत.
डोरमेटोरीस अर्थात शयनगृहे आणि देवस्थान भक्त निवासाच्या खोल्या स्वच्छ आणि सुस्थितीत असाव्यात. शुद्ध पिण्याचे पाणी आणि विजेचा अखंड पुरवठा केला जावा. श्री रेणुका देवी मंदिर परिसरात पूजेचे थेट प्रक्षेपण दाखवणाऱ्या स्क्रीन्सची व्यवस्था केली जावी. मंदिर आणि वसती प्रदेश जंतुनाशक फवारणी करून स्वच्छ ठेवावा. महिला भाविक प्रचंड संख्येने येत असल्यामुळे महिला पोलीस कॉन्स्टेबल्स व महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जावी. यात्रा काळात दारू व मांस विक्रीवर कडक निर्बंध घातले जावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. सदर निवेदनाच्या प्रती कार्यकारी अधिकारी, श्री रेणुका देवी मंदिर देवस्थान सौंदत्ती यल्लमा डोंगर, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सौंदती पोलीस ठाण्यालाही सादर करण्यात आल्या आहेत.
आपल्या मागण्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या सुमारे 37-38 वर्षापासून आमची संघटना कोल्हापूर आणि परिसरातील श्री रेणुका भक्तांसाठी कार्यरत आहे. श्री रेणुका भक्तांच्या सौंदत्ती डोंगरावरील ज्या काही अडीअडचणी -समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत दरवर्षी येत असतो असे सांगून त्यांनी श्री रेणुका देवी यात्रेच्या ठिकाणी भक्तांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात बोलताना कर्नाटक सरकारने बऱ्याच समस्या सोडवले असल्याचे सांगितले. मात्र तरीही काही अडचणी येत असतात. त्यामुळे दरवर्षी आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि सौंदत्ती देवस्थान यांना त्या समस्या सांगण्यासाठी येत असतो. जुगुळ भावीवर दरवर्षी पाण्याची समस्या असते. मागील वर्षी त्या ठिकाणी अस्वच्छतेबरोबरच तेथील पाणी दूषित होते.
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हा कोल्हापूरच्या भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. ही यात्रा गेली 38 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष करून कोल्हापूर शहरवासीयांची यात्रा म्हणून गणली जाते. कोल्हापूर भागातील यात्रेकरू महसूलही चांगला देतात. देवीचे दर्शन होण्याबरोबरच आम्हाला चांगल्या सुविधा मिळणं महत्त्वाचं आहे. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा प्रामुख्याने 12, 13 व 14 डिसेंबर 2024 रोजी होणार असून 14 डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याचे त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.