बेळगाव लाईव्ह : हुक्केरी येथील हिरण्यकेशी साखर कारखान्याचे खासगीकरण होऊ नये, यासंदर्भातील जाहिरात मागे घेण्यात आली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री ए. बी. पाटील आणि शशिकांत नाईक यांनी दिला आहे. हुक्केरी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या खासगीकरणाविरोधात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दि. अप्पणगौडा पाटील, बसगौडा पाटील, एस. आर. पाटील आणि विश्वनाथ कत्ती यांनी सहकार तत्त्वावर हा कारखाना स्थापन करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.
मात्र, सध्याच्या व्यवस्थापनाने कारखान्याला खासगी व्यक्तींना लीजवर देण्यासाठी जाहिरात दिली आहे, याचा आम्ही तीव्र विरोध करत आहोत. शेतकऱ्यांचे कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या या कारखान्याचे खासगीकरण होऊ नये.
व्यवस्थापनाने ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी आणि शेतकऱ्यांसोबत तसेच स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून कारखान्याच्या समस्या सोडवाव्यात. कारखाना सहकारी तत्त्वावरच चालवला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शशिकांत नाईक यांनीदेखील व्यवस्थापनावर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी मोठे दावे करणारे आता स्वतःच्या कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. व्यवस्थापनाने केलेले भाषण आणि कृतीतील या विसंगतीचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला विजय रवदि, भीमप्पा चौगला, शिवशंकर चौगला, विश्वनाथ तोडकरी, अण्णासाहेब पाटील, सलीम कलावंत, भीमप्पा रामगोनट्टी, वीरपाक्ष मरेण्णावर, बाळगौडा नाईक यांच्यासह अनेक नेते व शेतकरी उपस्थित होते.