बेळगाव लाईव्ह : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीसी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी बेळगावच्या खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी मोबाईल स्विच ऑफ करून फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
आत्महत्या केलेल्या रुद्रण्णाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींमध्ये बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सचिव सोमू आणि अशोक कबालीगर यांचा समावेश असून हे तिघेही फरार झाले आहेत.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी तपास अधिक गडद होत असताना, पोलिसांनी तपासासाठी उच्च अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. तपास सुरू असून काही लोकांची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज, व्हाट्सअप मेसेज, सोशल मीडियावरील मेसेज या आधारावर या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रुद्रण्णाने आत्महत्या करण्यापूर्वी कोणाशी संवाद साधला तसेच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या मेसेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या दिवशी कार्यालयात असलेले आरोपी क्रमांक १ तहसीलदार बसवराज नागराळ हे फरार झाल्याने संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सचिव सोमू हे आरोपी क्रमांक २ आणि अशोक कबालीगर हे आरोपी क्रमांक ३ आहेत. यातील सोमू या आरोपीने मृत रुद्रण्णा यडवण्णावर यांची बदली रोखण्यासाठी त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
२ लाख रुपये घेऊनही त्यांची बदली न रोखता सोमू सह इतर दोन्ही आरोपींनी मृत रुद्रण्णा यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे, या त्रासातुनच रुद्रण्णा यडवण्णावर यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आज बेळगावमध्ये निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. याचप्रमाणे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. यासोबतच रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. यामुळे तपासाला गती मिळाली आहे.