बेळगाव लाईव्ह :शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना मैसूरला घेऊन गेलेल्या खानापूर तालुक्यातील एका शाळेच्या बसने दुभाजकाला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात 10 विद्यार्थी -विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली.
अपघातातील जखमी मुला-मुलींना के. आर. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. म्हैसूर येथील बी. एन. रोड फाउंटन सर्कल जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील शांतिनिकेतन इंग्रजी शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी बसमधून सहलीसाठी म्हैसूरला गेले होते. तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहून ते माघारी परतत असताना सदर अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकून बस उलटली.
या अपघातात सुमारे 10 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाले. रस्त्यावरूनही ये -जा करणाऱ्या नागरिकांनी मदतीला धावून जात मुलांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या के. आर. हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह म्हैसूर शहर पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच जखमी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली.