बेळगाव लाईव्ह :समाजातील असमानता दूर करण्यासाठी दुर्बल घटकांना उत्तम प्रकारच्या योजना उपलब्ध करून देण्याद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेऊन त्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, असे कर्नाटक विधान मंडळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचे राज्याध्यक्ष पी. एम. नरेंद्रस्वामी यांनी स्पष्ट केले.
बेळगाव सुवर्ण विधानसौद्ध येथे आज शनिवारी सकाळी झालेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठीच्या योजना आणि कार्यक्रमांच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अनुसूचित जाती -जमातींसाठी स्वतंत्र कायदे जारी करण्यात आले असून सदर खात्याच्या अनुदानांतर्गत उपलब्ध केलेला निधी वेळेत खर्च करणे.
तसेच राखीव अनुदानाचा सदुपयोग उपयोग करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. सरकारकडून उपलब्ध झालेल्या अनुदानाचा अपव्यय होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. जिल्ह्यात अनुसूचित जाती -जमातीच्या कुटुंबांच्या संख्येनुसार वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्याबरोबरच त्यांच्यासाठी शाळा व विविध इमारती उभारण्यावर भर दिला गेला पाहिजे.
त्याचप्रमाणे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत त्यांच्या प्रत्येक वसाहतीत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. या संदर्भात समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून संबंधितांना आवश्यक सूचना कराव्यात नोडल अधिकारी नेमून नळपाणी योजनेसाठी जलवाहिन्या दर्जेदार असल्याची खातरजमा करून घेतली जावी, अशी सूचना नरेंद्रस्वामी यांनी केली.
अनुसूचित जाती जमातीतील कुपोषित मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील देवदासींच्या पुनर्वसनासाठी असलेल्या योजनेअंतर्गत भूखंड व राहण्यासाठी घरे नसलेल्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी जिल्हा प्रशासनाला समाज कल्याण व महिला बालकल्याण खात्याने सहकार्य करावे असे सूचित करून भटक्या विमुक्त जमातीसाठी असलेल्या सरकारी योजना व सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊन त्यांचाही उद्धार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून अनुसूचित जाती जमातीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. तसेच एससीएसपी/टीएसपी योजनेअंतर्गत जादा अनुदान शिक्षण क्षेत्रासाठी राखीव ठेवावे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात वगैरे सूचना पी. एम. नरेंद्रस्वामी यांनी बैठकीत केल्या.
बैठकीस कर्नाटक विधान मंडळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य बसवराज मत्तीमुडू, शांताराम सिद्धी, समाज कल्याण खात्याचे राकेश कुमार, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. भीमाशंकर गुळेद, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, आदींसह संबंधित विविध खात्यांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.