बेळगाव लाईव्ह :बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी सांबरा परिसरातील भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात येत असून येत्या दोन दिवसांत तलाठी महामार्गालगतच्या सर्व बाधित घरांना आणि व्यवसायांना या नोटिसा वितरित करणार आहेत. या पद्धतीने 100 फूट रस्ता रुंदीकरण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात मारुतीनगर ते निलजी हा रस्ता दुहेरी मार्गात रुंद करण्यात असून निलजीच्या पलीकडे एकच (सिंगल) रस्ता आहे. नुकतेच या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्वेक्षण कार्य हाती घेण्यात आले होते. हा रस्ता 100 फुटाचा केला जाणार असून रस्त्याच्या मध्यभागापासून दुतर्फा 50 फुटाचा केला जाणार आहे.
तसेच 10 फूट जागा पदपथ निर्मितीसाठी ठेवली जाणार आहे. भविष्यातील रस्ता रुंदीकरणाचे नियोजन पाहून सध्या अनेकांनी तशी जागा आपले घर आणि दुकानांसमोर राखीव ठेवून बांधकामं केली आहेत. निलजी येथील ऑफिसर्स मेसपासून पुढे मुतगा गाव व विमानतळ प्रवेशद्वारापर्यंत आजूबाजूला मोकळी जागा आहे.
तथापी सांबरा विमानतळापर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन झाल्यास अनेकांनी पुरेशी जागा समोर सोडली असली तरी सांबरा गावातून पुढे रस्ता डबल रोड व्हायचा असल्यास अनेकांच्या घरांवर हातोडा पडणार आहे. अगदी रस्त्याला लागूनच अनेकांची घरे आणि दुकाने असल्यामुळे अनेकांचे बरेच नुकसान देखील होणार आहे
प्रांताधिकारी कार्यालयाकडून तलाठ्यांना दोन दिवसांपूर्वी नोटिसा मिळाल्या असून आज गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी त्यांचे वितरण सुरू होणार आहे.
या नोटिसा नियुक्त भूसंपादन क्षेत्रामध्ये कोणतेही नवीन बांधकाम करण्यास मनाई करतात. ज्या कुटुंबांची जमीन संपादित केली जाईल ते प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भरपाई मागू शकतात. सांबरा विमानतळापर्यंत दुहेरी रस्त्याच्या विस्तारामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. लगतच्या गावांना त्यांच्या बांधकाम योजनांमध्ये भविष्यातील रस्ता विस्तारासाठी जागा सोडण्याची सूचना आधीच देण्यात आली आहे.