बेळगाव लाईव्ह :प्रादेशिक सेनेतर्फे बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरती मेळाव्यात आज रविवारी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील युवकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भरतीच्या ठिकाणी आज युवक हजारोंच्या संख्येने दाखल झाल्यामुळे त्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी सौम्य लाठीमार करावा लागत आहे.
बेळगाव येथील प्रादेशिक सेना मुख्यालयाच्यावतीने गेल्या 4 ते येत्या 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. प्रादेशिक सेनेच्या 106 पॅरा, 115 महार व 125 दि गार्ड्स इन्फंट्री बटालियनमधील जनरल ड्यूटी (जीडी) 257 आणि क्लार्कच्या 53 जागांसाठी सदर भरती सुरू आहे.
बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदानावर सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कर्नाटकसह तेलंगणा, गुजरात, गोवा, दादरा, नगर हवेली, पांडेचेरी, दिव, दमण, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमधील युवकांना टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेतले जात आहे.
आज रविवारी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील धारवाड, बळ्ळारी, बागलकोट, विजापूर, कारवार, गदग, हावेरी, रायचूर, मंगळूर, उडपी आणि यादगिर जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. बेळगावच्या युवकांसाठी हा एकच दिवस भरतीसाठी असल्याने सध्या मिलिटरी स्कूल मैदान परिसरात त्यांची हजारोच्या संख्येने गर्दी झाली आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी नाईलाजाने सौम्य लाठीमार करण्याची वेळ प्रादेशिक सेनेवर आली आहे.
यापूर्वी प्रादेशिक सेनेच्या भरतीसाठी इतक्या मोठ्या संख्येने युवक येत नव्हते. परंतु आता या भरतीसाठी देखील युवकांची गर्दी वाढली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी दररोज अडीच ते तीन हजार युवक बेळगावात दाखल होत आहेत. परिणामी शहरात विशेष करून कॅम्प खानापूर रोड, गोगटे सर्कल, कॅम्प परिसरात सामानाचे ओझे सांभाळत वावरणाऱ्या या युवकांची गर्दी वाढली आहे. बेळगाव रेल्वे स्थानक, कॅन्टोन्मेंट बस स्थानक, कॅम्प परिसरातील खुल्या जागांवर परगावहून भरतीसाठी आलेल्या युवकांनी आसरा घेतला आहे.
काल रेल्वे स्थानक आवारातील चरख्याची प्रतिमा बसविलेल्या ठिकाणी राजस्थान येथील युवकांनी आसरा घेतल्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्यांना आक्षेप घेतला. परिणामी वादावादी होऊन भरतीसाठी आलेल्या युवकांनी रेल्वे स्थानक आवारात हुल्लडबाजी केल्याची घटना काल घडली. रेल्वे स्थानकावर होणारी युवकांची गर्दी आणि काल झालेली घटना याबाबतचा अहवाल रेल्वे अधिकाऱ्यांनी हुबळी येथील मुख्य कार्यालयाला पाठवला आहे.
भरतीसाठी मोठ्या संख्येने युवक बेळगाव दाखल होत असल्याने रेल्वे गाड्यांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे. त्यामुळे सध्या वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, हुबळी -दादर एक्सप्रेस, पुदुच्चेरी -दादर एक्सप्रेस वगैरे रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जात आहेत. गेले दोन दिवस राजस्थानातील युवकांसाठी भरती प्रक्रिया झाली. आता उद्या सोमवारी 11 नोव्हें. आणि मंगळवारी 12 नोव्हें. रोजी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सैन्य भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे भरतीसाठी महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात युवक बेळगाव दाखल होणार आहेत.