बेळगाव लाईव्ह : संत बसवेश्वर हे केवळ कर्नाटकचे आहेत, असे म्हणणे आणि मानणे चुकीचे आहे. संत बसवेश्वर हे जितके कर्नाटकचे आहेत, तितकेच ते महाराष्ट्रातील आहेत.
त्यांच्या आयुष्यातील 63 वर्षांपैकी 21 वर्षे त्यांनी महाराष्ट्रातील मंगळवेढ्यामध्ये वास्तव्य केले. यामुळे संत बसवेश्वर महाराज हे केवळ एकाच क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, त्यांचे विचार, कार्य हे अफाट होते, असे विचार मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार व रिंगणचे संपादक सचिन परब यांनी मांडले.
श्री सरस्वती वाचनालय आयोजित कै. सरंजामे गुरुजी राज्य मराठी विकास संस्था अनुदान योजनेंतर्गत वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ’रिंगण’ या महात्मा बसवेश्वर विशेषांकाचा प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात आज पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
सरस्वती वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकुर सभागृह, कोरे गल्ली, शहापूर – बेळगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बसवेश्वर साहित्याचे अभ्यासक प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील रिंगणचे संपादक सचिन परब हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. देवदत्त दिगंबर परुळेकर हे होते.
सचिन परब पुढे म्हणाले, संत बसवेश्वरांच्या कर्नाटक – महाराष्ट्र येथील वास्तव्य आणि याबद्दल अनेक गैरसमज आहेत. संत बसवेश्वर हे केवळ कर्नाटकचे आहेत, असे म्हणणे आणि मानणे चुकीचे आहे. संत बसवेश्वर हे जितके कर्नाटकचे आहेत तितकेच महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्या आयुष्यातील 63 वर्षांपैकी 21 वर्षे त्यांनी महाराष्ट्रातील मंगळवेढ्यामध्ये वास्तव्य केले. त्यांच्या कार्याची रूपरेषा याचठिकाणी अधिक घडली. त्यांच्या दोन्ही पत्नी या महाराष्ट्रातील होत्या. तसेच त्यांचे अनेक शरण समकालीन सहकारी हेदेखील महाराष्ट्रातील होते. ज्यांनी बसवेश्वरांचे विचार पुढे नेण्याचे काम केले, त्यातील अनेकजण महाराष्ट्रातील होते. कन्नड भाषे इतके अधिक प्रमाणात नसले तरी महाराष्ट्रात देखील अनेक मराठी लिंगायत विचारांचे ग्रंथलिखाण झाले आहे. यामुळे संत बसवेश्वर महाराज हे केवळ एकाच क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, त्यांचे विचार, कार्य हे अफाट होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बसवेश्वर साहित्याचे अभ्यासक प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी संत बसवेश्वरांच्या तत्वांविषयी मार्गदर्शन केले. तर संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. देवदत्त दिगंबर परुळेकर यांनी संत परंपरेविषयी विचार मांडले.
या कार्यक्रमास सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास आर. सांगलीकर, अध्यक्षा प्रा. सौ. स्वरूपा जी. इनामदार, कार्यवाह प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांच्यासह साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.