बेळगाव लाईव्ह :संकेश्वर एपीएमसी यार्डातील भाजी मार्केटशी संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या तेथील तहसीलदारांसह एपीएमसी सेक्रेटरींवर कारवाई करून त्यांना निलंबित केले जावे या मागणीसाठी आज रयत संघटनेतर्फे रास्ता रोको करून बेळगाव एपीएमसी यार्डाच्या गेटला टाळे ठोकण्याद्वारे गेट बंद आंदोलन छेडण्यात आले.
कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे छेडण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. जोरदार निदर्शने करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडल्यामुळे एपीएमसी मार्केट यार्ड मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याबरोबरच एपीएमसी प्रवेशद्वार बंद करून त्याला टाळे ठोकले. गेट बंद आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला होता.
आपल्या आंदोलनासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक म्हणाले की, सरकारी एपीएमसी यार्ड असताना संकेश्वर येथील श्री दुर्गेश्वर मठाच्या खाजगी जागेमध्ये सुरू असलेल्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली जात होती.
सदर भाजी मार्केटमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना जवळपास 20-30 कोटींना लुबाडले जात होते. मात्र विद्यमान जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी सदर बेकायदेशीर प्रकाराला आळा घातला. जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील भाजी मार्केट खाजगी जागेतून सरकारी एपीएमसी मार्केट यार्डच्या जागेत सुरू केले. मात्र आता तेथील महिला तहसीलदाराने मिळाल्यासमोर योग्य कागदपत्रे सादर न करता शेतकऱ्यांना दगा दिला आहे याबाबत जाब विचारायचा तर एपीएमसी सेक्रेटरी रजेवर गेले आहेत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास सेक्रेटरी ला आपण रजा दिली नसल्याचे ते सांगतात त्यामुळे नेमके गौड बंगाल काय हे कळेनासे झाले आहे या पद्धतीने जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देऊन वेठीस धरले जात आहे याचा निषेध म्हणून आणि शेतकरी जगावयासाठी आम्ही हे आंदोलन पुकारले असून रास्ता रोको करून बेळगाव एपीएमसी यार्डाला टाळे ठोकले आहे असे शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी सांगितले तसेच कृषी उत्पादनांना योग्य दर दिला जावा, त्याचप्रमाणे संकेश्वरच्या तहसीलदारांसह एपीएमसी सेक्रेटरीना तात्काळ निर्णय निलंबित करावे अशी आमची मागणी आहे, असे नायक यांनी सांगितले.
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी यावेळी बोलताना श्री दुर्गेश्वर मठाच्या मालकीच्या खाजगी जागेत सुरू असलेले संकेश्वर येथील एपीएमसी भाजी मार्केट सरकारने आपल्या जागेत सुरू करावे यासाठी हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश येऊन आता त्या ठिकाणचे भाजी मार्केट एपीएमसी यार्डात सुरू आहे.
मात्र मठाचे स्वामीजी आणि कांही अन्य मंडळी दबाव आणून ते भाजी मार्केट बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगाव एपीएमसीच्या बाबतीत देखील हाच प्रकार घडत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून बेळगाव संकेश्वरच नव्हे तर राज्यातील सर्व ठिकाणच्या खाजगी एपीएमसीमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे. खासगी जागेतील एपीएमसी बंद करून सरकारी जागेत चालविल्या जाव्यात अशी आमची रयत संघटनेची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलना करत आलो आहोत.
मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचार बोकाळ आहे असे सांगून संकेश्वरच्या तहसीलदारांनी तेथील एपीएमसीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देखील स्थगिती आदेश घेतला आहे. हा स्थगिती आदेश त्वरित मागे घेतला जावा आणि ज्या सरकारी जागेत संकेश्वर एपीएमसी भाजी मार्केट सुरू आहे ते तेथेच सुरू राहिले पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी स्पष्ट केले.