बेळगाव लाईव्ह : शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव शहरातील पोलिस आयुक्तालयाच्या अधिकारक्षेत्रातील विविध पोलिस ठाण्यांच्या व्याप्तीत घडलेल्या चोरी प्रकरणातील ऐवज मूळ मालकांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया पार पडली.
जिल्हा पोलीस क्रीडांगणावर झालेल्या प्रॉपर्टी परेडमध्ये चोरीला गेलेला ऐवज संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आली.
विविध पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या चोरी प्रकरणातील तब्बल १ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने यासह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा ताबा मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आला.
गेल्या काही दिवसात शहर तसेच उपनगरांमध्ये याचप्रमाणे तालुक्यातही चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
तक्रारींच्या आधारे तपास सुरु करून काही चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल आज मूळ मालकांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडली.
या वर्षी बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील 339 घरफोडीच्या घटनांची नोंद झाली आहे, त्यापैकी 117 प्रकरणांचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण 5 कोटी 13 लाख 2 हजार 277 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे . त्यापैकी 1 कोटी 67 लाख 13 हजार 555 रुपयांच्या वस्तू परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
आणखी अनेक प्रकरणांचा तपास सुरू असून त्यांचा खुलासा लवकरच होईल अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली.
पोलीस विभागाच्यावतीने चोरी प्रकरणांचा छडा लावून संबंधितांना त्यांच्या किंमती वस्तू परत मिळून दिल्याबद्दल नागरिकांकडून पोलिसांच्या या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.