Tuesday, November 26, 2024

/

फोटोग्राफरचे अपहरण, आठ जणांना अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महिलेचे फोटो काढून ब्लॅकमेल करत असलेल्या फोटोग्राफरचे अपहरण करून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आठ जणांना बेळगावमधील माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेच्या फोटोचा वापर करून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपावरून फोटोग्राफरचे अपहरण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बैलहोंगल तालुक्यातील मुरकीबावी गावचा उमेश होसुरू हा फोटोग्राफर अपहरणाच्या घटनेचा शिकार झाला.याबाबत तक्रार दाखल करून माळमारुती पोलिसांनी कारवाई केली.

आरोपींमध्ये बसवराज नरट्टी, प्रविण उमराणी, विक्की, तारा नरट्टी, लक्ष्मी नरट्टी यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. बैलहोंगल तालुक्यातील बेलवडी गावात बसवराज नरट्टीच्या स्टुडिओमध्ये काम करणारा उमेश, 12 वर्षांपासून त्याच ठिकाणी काम करत होता. परंतु, त्याला वाजवी वेतन मिळत नसल्याने त्याने मागील वर्षी स्टुडिओ सोडून स्वतःचे स्टुडिओ सुरू केले होते. तो विवाह आणि गृहप्रवेश व इतर ऑर्डर घेत व्हिडीओग्राफी करत होता. दोन दिवसांपूर्वी, बेळगावमधील केपीटीसीएल हॉलमध्ये चाललेल्या एक विवाहाच्या कार्यक्रमाचे ऑर्डर घेतलेला उमेश, विक्की नावाच्या व्यक्तीसोबत गाडीतून निघून गेला आणि त्यानंतर विक्कीने उमेशचे अपहरण केले.

चिवटगुंडी क्रॉसजवळ गाडी थांबवून विक्कीने लोखंडी रॉडने उमेशवर हल्ला केला. त्यानंतर, बैलहोंगलच्या बसवराज नरट्टीच्या नातेवाइकांच्या घरात उमेशला नेले आणि त्याला महिलेच्या फोटोबाबत जाब विचारून मारहाण करण्यात आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर उमेशने बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर माळमारुती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपींनी जुन्या वैमनस्यामुळे त्याच्यावर हल्ला केला आणि महिलेच्या फोटोची कथित कहाणी तयार करून आपल्यावर हल्ला केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. उमेशने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.