बेळगाव लाईव्ह : खाद्यतेलातसह किराणा मालाची दरवाढ झाली असतानाच कांदा व लसणाच्या दरवाढीची गृहिणींच्या बजेटला फोडणी बसत आहे. स्वयंपाक घरात प्रत्येक मसाल्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांदा व लसणाची दरवाढ कायम असल्याने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे.
सर्वसामान्य जनतेला महागाईचा चटका बसत असून, डाळी, कडधान्ये आणि खाद्यतेलाच्या दरवाढीनंतर आता कांद्याचे दरही वाढत आहेत. लग्नसराई आणि यात्रा-जत्रांच्या काळात कांद्याच्या वाढत्या मागणीमुळे दर उंचावत चालले आहेत.
देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. डाळी, कडधान्ये आणि खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंच्या किंमतींनी आधीच कळस गाठला असताना, आता कांद्याचे दरही हळूहळू चढू लागले आहेत.
बाजारात सध्या जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदाही विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, अपेक्षित आवक नसल्याने दर वाढत आहेत. सण-उत्सवांचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई आणि यात्रा-जत्रांच्या काळाला सुरुवात झाली आहे. यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.
सध्या बाजारात कांद्याचे दर प्रति किलो ३०-४० रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत पोहोचत आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील असमतोल यामुळे दरवाढ होत आहे. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना घरखर्चाचा भार सहन करावा लागत आहे. सरकारने महागाईवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
कांदा भाव वाढीचा परिणाम शहरातील हॉटेल्स, वडापावच्या गाड्या आणि खानावळीतही दिसून येत आहे. ताटातून कांदा गायब झाला असून, नॉनव्हेज हॉटेल्समध्ये ग्राहकांनी कांदा प्लेटसाठी वेगळे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील दरपत्रकही हॉटेल्समध्ये लावण्यात आले असून ताटात वाढण्यात येणाऱ्या कांद्याच्या कोशिंबिरीची जागा आता काकडी आणि कोबीने घेतल्याचे दिसत आहे.
तत्पूर्वी, टोमॅटोचे दर स्थिर असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, कांद्याच्या दरवाढीने स्वयंपाकघराचा खर्च पुन्हा वाढवला आहे. महागाईच्या या वाढत्या आलेखामुळे नागरिक चिंतित असून, लवकरात लवकर किंमती आटोक्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.