बेळगाव लाईव्ह :श्रीराम सेना हिंदुस्थान व सरकार तालीम मंडळ गांधीनगर बेळगाव यांच्यातर्फे आयोजित एका माणसाने बैलगाडी ओढण्याच्या जंगी शर्यतीचे मोठ्या गटातील विजेतेपद नागेश नाईक देवलापूर यांनी, तर लहान गटाचे जेतेपद सिद्धेश्वर प्रसन्न यरमाळ यांनी पटकावले आहे.
दुर्गामाता रोड जुने गांधीनगर बेळगाव येथे उपरोक्त भव्य बैलगाडी शर्यत काल रविवारी सायंकाळी क्रीडाप्रेमींच्या उस्फुर्त प्रतिसादासह मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, म. ए. समितीचे युवा नेते प्रशांत भातकांडे, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय पाटील, माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची आणि पोलीस उपनिरीक्षक व्हण्णाप्पा तळवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बैलगाडी पूजन करण्याद्वारे झाले.
शर्यतीच्या मोठ्या गटात जवळपास 22 तर लहान गटात 28 स्पर्धकांनी भाग घेतला होता. अतिशय चुरशीने आणि रोमांचकारक वातावरणात पार पडलेल्या बैलगाडी ओढण्याच्या या शर्यतीमधील पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते पुढील प्रमाणे आहेत मोठा गट : 1) नागेश नाईक देवलापूर, 2) चव्हाटा प्रसन्न कणबर्गी अमित घुगरट्टी, 3) श्री मंगाई देवी प्रसन्न वडगाव, 4) श्री सिद्धेश्वर प्रसन्न हण्णीगिरी, 5) श्री हनुमंत प्रसन्न संतीबस्तवाड. लहान गट : 1) श्री सिद्धेश्वर प्रसन्न येरमाळ, 2) श्री नागनाथ प्रसन्न बेकिनकेरी, 3) श्री दुर्गादेवी प्रसन्न एम. के. हुबळी, 4) सागर पाटील यरमाळ, 5) श्री कलमेश्वर प्रसन्न (कार्तिक) एम. के. हुबळी. शर्यतीसाठी पंच म्हणून निखिल हिरोजी, बाळू घसारी, राहुल जाधव, विश्वजीत वंटमुकर, चंद्रकांत कोंडुसकर व राजू चौगुले यांनी काम पाहिले.
शर्यतीनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे सचीन चव्हाण, बाळू तवणोजी आदींच्या हस्ते पार पडला. शर्यतीतील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे मेंढा, रोख 4000 रु., रोख 3000 रु., पाण्याची पिंप व दुधाचे कॅन अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाप्रेमींनी शर्यत मार्गाच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती.
शर्यत यशस्वी करण्यासाठी सचीन चव्हाण, बाळू तवणोजी, चेतन चव्हाण, सचिन जाधव, निखिल हिरोजी, बाळू घसारी, मोहन राजगोळकर, साहिल तानवडे यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थान व सरकार तालीम मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.