Friday, December 27, 2024

/

विद्यार्थ्यांचा बसमधून जीवघेणा प्रवास थांबणार तरी कधी…?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जून २०२३ साली सुरु झालेल्या शक्ती योजनेमुळे बसमधील गर्दी वाढली आहे. मात्र त्यापूर्वीही अपुरी बससेवा, अनियमित बससेवा यामुळे प्रवाशांचे आणि मुखत्वे विद्यार्थ्यांचे हाल सुरूच होते. आता शक्ती योजना सुरु झाल्यामुळे या समस्येत आणखीन भर पडली आहे. बेळगाव शहर, उपनगर, ग्रामीण भागासाठी सुरु असणाऱ्या बससेवेवर कायमचेच ताशेरे ओढले जात असून बेळगाव – खानापूर दरम्यान सुरु असलेल्या बस फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसच्या पायरीवर लोंबकळत प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अनेक जागरूक नागरिकांनी याबाबत सोशल मीडियावर कित्येकवेळा व्हिडीओ टाकून जनतेसहित रहदारी विभाग आणि परिवहन मंडळाच्या निदर्शनात बाब आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हि समस्या सोडविण्याकडे परिवहनचे दुर्लक्षच झाले असून विद्यार्थी देखील वेळेत शाळा – महाविद्यालयात पोहोचता यावे यासाठी जीवघेणा प्रवास बसमधून करत आहेत.

बेळगाव शहर – खानापूर हा पल्ला विद्यार्थ्यांसाठी लांब आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ जास्त असते. या मार्गावर धावणाऱ्या अनेक बसमधून नेहमीच तुडुंब गर्दी दिसून येते. याठिकाणी बसफेऱ्या वाढवाव्यात, पुरेशी बस सेवा उपलब्ध करून द्यावी यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली, मात्र याचा आजवर काहीच उपयोग झाला नाही. बसेसचा तुटवडा असल्याने पासधारक विद्यार्थ्यांना दररोज बससाठी संघर्ष करावा लागत आहे.

दरवाजात लोंबकळत जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. बस फेऱ्या वाढवून प्रवास सुरक्षित करावा, अशी मापक अपेक्षा आता विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. दरम्यान शहरातील विविध बसस्थानकावर विद्यार्थी बसमध्ये चढण्यासाठी शर्यतीप्रमाणे धावू लागल्याचे दिसत आहे. या चढाओढीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मागील वर्ष दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास कायम सुरु आहे.

वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव ते खानापूर दरम्यान तुडुंब भरून धावणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांवर बसच्या दारात उभे राहून धोकादायकरित्या प्रवास करण्याची वेळ येत आहे. तरी परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या मार्गावरील बसेसची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

बेळगाव ते खानापूर दरम्यान धावणाऱ्या वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या तसेच अलीकडे नेहमीच गर्दी होत. खानापूर ते बेळगाव बसगाड्या दिवसभरातील कांही मोजक्या फेऱ्या वगळता प्रवाशांनी तुडुंब भरून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांवर बसच्या दारात दाटीवाटीने खिडकीचा गज धरून उभे राहून जवळपास लोंबकळत धोकादायकरित्या प्रवास करण्याची वेळ येत आहे. बस धावत असताना दारात शेवटच्या पायरीवर तोबा गर्दीत बसच्या खिडकीचे गज धरून प्रवास करणाऱ्यांपैकी एखाद्याचा गजावरून हात निसटू शकतो आणि तसे घडल्यास जीवाला मुकावे लागू शकते. या पद्धतीने प्रवाशांना जीवावर उदार होऊन कराव्या लागणाऱ्या प्रवासास बेळगाव -खानापूर दरम्यानची अपुरी बस सेवा कारणीभूत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. तेंव्हा परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता बेळगाव -खानापूर मार्गावरील बसेसची संख्या वाढवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

 

Bus nwkrtc

बेळगाव विभागात 650 हून अधिक बसेस सेवेत असून यापैकी काही बसेस लांब पल्ल्यासाठी धावतात. तर काही शहरांतर्गत तर काही ग्रामीण भागातही धावतात. मात्र प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याने सर्वत्र बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या शाळेच्या वेळेत बसेसमध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी करतच प्रवास करावा लागत आहे. तर काही बसस्थानकावर बसेस फूल होऊन धावत असल्याने न थांबताच पुढे जात असल्याचे प्रकार पहावयास मिळत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थी जीव धोक्यात घालून दरवाजात लोंबळकत प्रवास करत असल्याचेही दिसत आहेत.

त्यामुळे हा धोकादायक प्रवास थांबणार तरी कधी? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसहित आता रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनाही पडू लागला आहे. यामुळे आता याकडे परिवहन मंडळाने तसेच प्रशासनाने देखील हस्तक्षेप करून समस्या मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.