बेळगाव लाईव्ह : अलीकडेच बेळगाव – म्हैसूर एक्स्प्रेस मध्ये स्फोट झाल्याचे वृत्त काही ऑनलाईन वृत्त वाहिनीवर प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल रेल्वे विभागाने घेत प्रकरणाची चौकशी आणि तपास करत सदर वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
वास्तविक, रेल्वे क्रमांक 17325 या गाडीतून धूर दिसल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तशी कोणतीच गोष्ट घडली नाही. तसेच कोणत्याही प्रवाशाला डब्यातून उतरावे लागले नाही.
या घटनेच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आणि म्हैसूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डब्याची तपासणी केली.
सदर घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे विभागाने पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात, कुठलाही स्फोट झाल्याचे तथ्य नसून चुकीच्या बातम्यांमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सत्यापन करण्याचा सल्ला प्रसारमाध्यमांना देण्यात आला आहे.