बेळगाव लाईव्ह : बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा यांनी आज दिली. आज बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी 600 एकर जमीन रेल्वे विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल. या मार्गावर केरेकोप्प ते देसुर असा 73 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. 927 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 42 एकर जागेवर राबवला जाणार आहे. बेळगावचे माजी खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी रेल्वे राज्यमंत्र्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. १ वर्षाचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या 1 महिन्यात पूर्ण केले, हे कौतुकास्पद आहे.
पुढील टप्प्यासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली असून उद्या तांत्रिक पथक यासाठी पाहणी दौरा आखणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली, सर्व रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण होण्याच्या दिशेने काम चालू आहे, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून समन्वयपूर्ण कार्य केले तर विकास शक्य असल्याची प्रतिक्रिया व्ही. सोमाण्णा यांनी व्यक्त केली.
या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.