बेळगाव लाईव्ह : बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शताब्दी महोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्यात आले असून बेळगावमध्ये साजरा होणारा शताब्दी सोहळा दिमाखात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कायदा व संसदीय खात्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी आज दिली.
मंत्री एच.के. पाटील यांनी आज बेळगावला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ठिकाण असलेल्या हुदली गावाला भेट दिली. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आजच्या तरुण पिढीपर्यंत महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान, साहित्य आणि मूल्ये पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय अधिवेशनाची शताब्दी भव्य पद्धतीने साजरी केली जात आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली गांधी भारत कार्यक्रम आयोजित केला जात असून यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समितीही कार्यरत राहणार आहे.
केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून वीरप्पा मोईली हे मानद अध्यक्षपद, बी.एल. शंकर निमंत्रक म्हणून काम पाहणार आहेत.
सुमारे २५ कोटी रुपये खर्चून हा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असून या कार्यक्रमासाठी बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, एआयसीसी अधिवेशनाचा इतिहास पुन्हा रचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मंत्री एच. के. पाटील म्हणाले.
यावेळी मंत्री एच.के.पाटील यांच्यासमवेत मंत्री सतीश जारकीहोळी तसेच गांधी भारत समितीच्या सदस्यांनी बेळगाव येथे शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली.