बेळगाव लाईव्ह : बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची चाळण उडाल्याने हा रस्ता जीवघेणा बनला आहे. यासंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीसह येथील ग्रामस्थ, तसेच या भागातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा निवेदने सादर करूनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या ११ नोव्हेंबर रोजी उचगाव फाटा किंवा हॉटेल मधुरा नजीक रास्तारोको करून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती आज मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिली.
बाची – तुरमुरी रस्ता हा रायचूर राज्य महामार्ग म्हणून नोंद आहे. मात्र या रस्त्याच्या झालेल्या अवस्थेकडे पाहता या रस्त्यावरून मार्ग काढणे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही अवघड बनले आहे. मागील एक महिन्यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनानंतर थातुरमातुर कामे करून तोंडाला पाने पुसण्यात आली.
पुन्हा या रस्त्याची अवस्था जैसे थे झाली असून या रस्त्याची दुरुस्ती करण्यापेक्षा संपूर्ण रस्ता नव्याने बांधण्यात यावा, रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशा सूचना बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात एक महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र अल्टिमेटम देऊनही कोणतीही हालचाल नसल्याचे दिसून येत असून आता रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी होणाऱ्या रास्ता रोकोसाठी या भागात जनजागृती करण्यात येणार असून विविध ग्राम पंचायतींना या आंदोलनात कसे सामील करून घेता येईल, आंदोलन कसे यशस्वी करता येईल, यासाठी विचार विनिमय करण्यात येणार आहे.
केवळ बाची – तुरमुरी रस्त्याचीच दुरावस्था झाली नसून मच्छे, वाघवडे, बडस, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, कडोली असे तालुक्याच्या विविध भागातील अनेक रस्ते दुरुस्त झाले आहेत. तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे मनोहर किणेकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना समिती नेते आर एम चौगुले म्हणाले, ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे आश्वासन देणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची फसवणूक करत दिलेली आश्वासने फोल ठरवली आहेत. अनेक वेळा निवेदने देऊनही दुर्लक्ष करण्यात आले असून जनतेच्या तोंडाला केवळ पाने पुसण्यात आली आहेत, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर आय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मार्कंडेय सहकार संस्थेला तालुका समितीकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा निर्धार देखील तालुका समितीने केला. ग्रामीण भागातील मराठी भाषिक शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी मार्कंडेय साखर कारखान्याला ऊस पाठवावा असे आवाहन देखील करण्यात आले.
यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.