बेळगाव लाईव्ह : अधिवेशन, काळादिन जवळ आला कि नेहमीच तथाकथित कन्नड संघटनांच्या मूठभर तथाकथित कार्यकर्त्यांच्या पिल्लावळीची कोल्हेकुई सुरु होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचा निश्चय केला असून यासाठी समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
मात्र याविरोधात आज काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महामेळावा काढण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना हद्दपार करा, अशी मागणी केली आहे.
आज राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून करवे च्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीचा खोळंबा केला. शिवरामगौडा गटाच्या वाजिद हिरेकुडी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत मूठभर कार्यकर्त्यांची समितीविरोधात घोषणाबाजी सुरु होती. महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा भरविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, समिती नेत्यांना हद्दपार करावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
मात्र दुसरीकडे समिती नेत्यांनी महामेळावा भरवून आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. येत्या 9 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी म. ए. समितीतर्फे महामेळावा भरविला जाणार आहे. या महामेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी म. ए. समितीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी वेळोवेळी आयोजित करण्यात येणारी आंदोलने, मोर्चे आणि महामेळाव्यांना परवानगी नाकारली जाते. मात्र आजपर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे आणि महामेळावे यशस्वी झाले आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत चर्चा करून कळविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दुसरीकडे परवानगी मिळो अगर न मिळो महामेळावा घेण्याचा निर्धार समितीने केला आहे.