Wednesday, January 8, 2025

/

मेघा गॅसच्या नावे आणखी तीन ग्राहकांची फसवणूक..

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ‘तुम्ही मागील महिन्याचे गॅसचे बिल भरला नाही. आज सायंकाळपर्यंत पूर्णपणे बिल भरले नाही तर रात्री गॅसजोडणी तोडण्यात येईल’ असे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून ग्राहकांच्या बँक खात्यातील मोठ्या प्रमाणात रक्कम हडप करण्यात येत असल्याचा प्रकार अलीकडे उघडकीस आला आहे.

शहर – परिसरात मेघा गॅस कंपनीच्या नवे ऑनलाईन गॅस जोडणी करण्यात आली असून या कंपनीच्या नावावर फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत.

शहर सायबर क्राईम विभाग व मेघा गॅस व्यवस्थापनाच्यावतीने सातत्याने जागृती करूनही फसवणूक थांबता थांबेनासे झाले असून बुधवारी शहरातील तीन ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

बुधवारी एका ग्राहकाच्या खात्यातून 60 हजार, आणखी एका ग्राहकाच्या खात्यातून 14 हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. एकूण तिघा जणांना ठकविण्यात आले आहे. गेल्या पंधरवड्यात पंधराहून अधिक जणांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून मेघा गॅसच्या नावे फसवणूक सुरू असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आपली गॅसजोडणी तोडली जाणार, या भीतीने भामट्यांकडून दिल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ‘ऑनलाईन बिल भरा, गैरसोय टाळा’ असा सल्ला देत त्यांच्याकडून रक्कम भरून घेतली जात आहे.

आणखी काही प्रकरणात मेघा गॅसच्या नावे व्हॉट्स ऍपवर एक लिंक पाठविली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यातील रक्कम गायब होत आहे. काही प्रकरणात ग्राहकांकडून ओटीपीची मागणी केली जात आहे. ‘तुमचा व्यवहार सुरळीत करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी कळवा’ असे सांगत ओटीपी मागितला जात आहे.

त्यांच्यावर विश्वास ठेवून ओटीपी दिल्यानंतर खात्यातील रक्कम हडप करण्यात येत आहे. मेघा गॅसनेही अनेक वेळा आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका, कंपनीकडून गॅसजोडणी तोडण्याचे मेसेज पाठवत नाहीत, असे सांगितले आहे. यामुळे आता नागरिकांनी सतर्कता बाळगून अशा फसव्या मेसेज किंवा कोणत्याही गोष्टीला बळी न पडता, सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.