बेळगाव लाईव्ह : नवी दिल्लीच्या संरक्षण विभागाच्या संसदीय स्थायी समितीने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने हैदराबाद शहरात विविध संरक्षण विभागांच्या प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत बेळगाव शहराशी संबंधित संरक्षण विभागाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.
हैदराबाद येथे झालेल्या या बैठकीत, संरक्षण विभागाशी संबंधित बेळगावातील काही प्रमुख समस्यांवर चर्चा झाली. विशेषतः,
टिळकवाडीतील वाळवेकर प्लॉट आणि चौगुलेवाडी ते पापामळा या दरम्यानचा बंद रस्ता, जो संरक्षण विभागाच्या अधिकारात येतो, तो सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली.
संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंग यांच्यासमोर ही समस्या मांडण्यात आली. तसेच या रस्त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
या बैठकीस खास. जगदीश शेट्टर यांच्यासह संरक्षण विभागाच्या संसदीय स्थायी समितीचे सदस्य हजर होते.