बेळगाव लाईव्ह :होन्निहाळ- मावीनकट्टी गावादरम्यानच्या बेळगाव विमान तळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या शेतवडीत घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात मारीहाळ पोलिसांना 11 दिवसानंतर यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून बेळगावपर्यंत मोटरसायकल वरून लिफ्ट मागून दारू पिलेल्याचे बिल भरण्यास नकार दिल्याने संबंधित युवकाचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
होन्निहाळ- मावीनकट्टी गावादरम्यानच्या बेळगाव विमान तळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या शेतवडीत गेल्या सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी निंगनगौडा शिवनगौडा सनगौडर (वय 26, मूळ रा. आलदकट्टी, ता. सौंदत्ती, सध्या रा. श्रीनगर बेळगाव) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
मारीहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्ती घडलेल्या या खून प्रकरणाचा पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून चाणाक्षपणे छडा लावला आहे. याप्रकरणी बेळगाव तालुक्यातील मारीहाळ गावांमधील दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
संबंधित दोघेजण हे एका डबल मर्डर अर्थात दुहेरी खून प्रकरणातील आरोपी असून अलीकडेच त्यांची कारागृहातून जामीनावर मुक्तता झाली आहे. आता ते निंगनगौडा यांच्या हत्येप्रकरणात देखील आरोपी झाले आहेत.
निंगनगौडा सनगौडर हा गेल्या 17 नोव्हेंबर रोजी रात्री यरगट्टी येथून बसने बेळगावला येत होता. मात्र वाटेल दारूच्या नशेत तो मोदगा येथे बसमधून उतरला. तिथून तो चालत मारीहाळ येथे आला. त्या ठिकाणी पल्सर मोटरसायकल वरून जाणाऱ्या दोघा जणांना थांबवून त्याने त्यांच्याकडे बेळगावपर्यंत लिफ्ट मागितली. तसेच त्या बदल्यात आपण एक हजार रुपये देऊ असे सांगितले.
त्यामुळे लिफ्ट देण्यास तयार झालेल्या पल्सर मोटरसायकल स्वार निंगनगौडा याला आपल्या सोबत दारू पिण्यासाठी बाळेकुंद्री खुर्द गावा नजीकच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी यथेच्छ दारू पिल्यानंतर त्या दोघांनी निंगनगौडा याला हॉटेलचे बिल देण्यास सांगितले. तेंव्हा त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून बिल देण्यास नकार दिला.
त्यावरून संतप्त झालेल्या त्या दोघा मोटरसायकल स्वारांपैकी एकाने निंगनगौडाच्या कानफडात लगावल्याने रक्तस्त्राव झाला. तेंव्हा चिडलेल्या निंगनगौडा याने त्या दोघांना तुमची पोलिसात तक्रार करतो अशी धमकी दिली. परिणामी आणखी भडकलेले दोन्ही मोटरसायकल स्वार निंगनगौडाला जबरदस्तीने आपल्या पल्सरवर बसवून होन्निहाळ- मावीनकट्टी गावादरम्यानच्या बेळगाव विमान तळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या शेतवडीत घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी रागाच्या भरात दगडाने ठेचून निंगनगौडा याचा निर्घृण खून केला. पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी वरील प्रमाणे गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.