Thursday, November 14, 2024

/

सीमाभागातील मराठी भाषिकांनाही महाराष्ट्राच्या राजकारणाची उत्कंठा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. येत्या २० तारखेला महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीने लढत होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे परिणाम बऱ्याच अंशी सीमाभागावर देखील दिसून येत असून महाराष्ट्राच्या राजकारणावर सीमाप्रश्नाचे भवितव्य देखील विसंबून आहे. यामुळे आता सीमाभागातील मराठी भाषिकांनाही महाराष्ट्राच्या राजकारणाची उत्कंठा लागली असून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चा सीमाभागात तुफान रंगताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यासह राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याशी सीमावासियांच्या भावना अधिक जोडल्या गेल्या आहेत. सीमाप्रश्नाशी जिव्हाळ्याचे नाते आणि चाड असणारे, सीमाप्रश्न आणि सीमावासियांविषयी तळमळ असणाऱ्या या दोन्ही पक्षांचे बलाबल सध्या सीमावासियांच्या उत्सुकतेचे विषय बनले आहेत.Chandgad

एकीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस वाढली असून, सीमाभागातील राष्ट्रीय पक्षांचे नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी जात आहेत. महाराष्ट्रातील विविध मतदार संघांमध्ये सीमाभागातील राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचा प्रचारात सहभाग वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपकडून अधिकाधिक नेते महाराष्ट्राच्या निवडणूक रणधुमाळीत सामील झालेले दिसून येत असून दुसरीकडे काँग्रेसनेही निवडणुकीच्या कामाचा जोर वाढवल्याचे चित्र आहे.

एकीकडे भाजप आणि काँग्रेस महाराष्ट्रातील उमेदवारांचा प्रचार करत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातूनही मराठी भाषिक नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचा प्रचार करण्यासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणते मुद्दे प्रभावी ठरणार, कोणते फॅक्टर्स मतदारांवर आणि निकालावर प्रभाव टाकणार, कुणाची सत्ता स्थापन होणार आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कशी असणार? याकडे आता महाराष्ट्रासह सीमावासीयांचेही लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रात ज्या पक्षाचे सरकार स्थापन होणार त्याचा सीमावासीयांना कोणता आणि कसा लाभ होणार? सीमावासियांच्या आशा – आकांक्षाकडे सत्तेवर नव्याने येणाऱ्या सरकारचा दृष्टिकोन कसा असणार? सीमाप्रश्नाविषयी सत्तेवर येणाऱ्या सरकारकडून आग्रही भूमिका घेतली जाणार का? या प्रश्नांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सीमावासियांच्या लक्ष वेधले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.