बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे शहापूरच्या नाथ पंथीय रावळ समाजातर्फे आज शनिवारी नाथ पै सर्कल येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये श्री काळभैरव जयंती मोठ्या भक्ती भावनेने साजरी करण्यात आली.
श्री काळभैरव जयंतीच्या निमित्ताने नाथ पै सर्कल येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये काल शुक्रवारी सायंकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे आज सकाळी अभिषेक, पूजा, आरती वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मंदिरात स्त्री-पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. जन्मोत्सव सोहळ्यानंतर विशेष प्रसाद वाटप करण्यात आले ज्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. श्री काळभैरवनाथ जयंती निमित्ताने देवदर्शनासाठी भल्या पहाटेपासून मंदिरात भाविकांची रीघ लागली होती.
श्री काळभैरव जयंती संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंदिर व्यवस्थापन समितीचे सल्लागार -मार्गदर्शक श्रीकांत काकतीकर यांनी सांगितले की, नाथ पै सर्कल, शहापूर येथील श्री काळभैरव मंदिर हे या परिसरातील पंचक्रोशीतील सर्वात पुरातन मंदिर असल्याचे मानले जाते. या मंदिराची स्थापना श्री राऊळ महाराजांच्या पूर्वजांनी केली होती. कालांतराने स्थानिक समिती मंदिराची सेवा करत आहे.
मागील वर्षी जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या श्री काळभैरव नाथ मंदिरामध्ये वर्षभर दर अमावस्या व पौर्णिमा, काळभैरव जयंती, दसरा उत्सव वगैरे सण उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात. आता आज मंदिरामध्ये श्री काळभैरव जयंती साजरी होत आहे. या जयंतीच्या निमित्ताने काल सायंकाळी श्री भैरवनाथ यज्ञ-होम झाला असून आज सकाळी अभिषेक पूजा आरती वगैरे अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले.
त्यानंतर श्री भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. जन्मोत्सव सोहळ्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येत असून आता दुपारनंतर भजन आणि सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.
काल सायंकाळपासूनच देवदर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे अशी माहिती देऊन पुढील काळात मंदिराच्या अधिकाधिक विकासासाठी समस्त भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीकांत काकतीकर यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने केले.