बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तात्काळ उद्या मंगळवारपासून हिंडलगा ते सुळगा या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम हाती घेऊन पूर्ण केले जाईल. त्यानंतर हिंडलगा ते चिरमुरेपर्यंतच्या रस्त्याचा विकास केला जाईल, असे ठोस आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोबरद यांनी दिले आहे.
बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील हिंडलगापासून बाची गावापर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण करून तो चौपदरी केला जावा, या मागणीसाठी आज सोमवारी सकाळी बेळगाव तालुका म. ए. समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांशी बोलताना कार्यकारी अभियंता एस. एस. सोबरद यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
त्यांनी सांगितले की, हिंडलगा ते सुळगा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम उद्या मंगळवारपासून त्वरित प्रारंभ केले जाईल. या विकास कामांतर्गत हिंडलगा गावातील चौपदरी रस्त्याचा सुळग्यापर्यंत विस्तार करण्यात येईल. त्यानंतर सुळगा ते चिरमुरी गावापर्यंतच्या 60 फूट रुंदीच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल.
त्याचप्रमाणे हिंडलगा ते बाचीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणी संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे धाडला जाईल, असे अभियंता सोबरद यांनी सांगितले. याप्रसंगी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह समितीचे अन्य नेते मंडळी, पोलीस अधिकारी, समिती कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर आश्वासनामुळे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आज छेडलेल्या रास्ता रोको आंदोलनाला यश आले आहे. तथापि येत्या 1 डिसेंबर 2024 पूर्वी बाचीपर्यंतच्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याच्या विकासाची काम हाती न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला घेराव घालून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला आहे.