बेळगाव लाईव्ह :प्रादेशिक सेनेतर्फे आयोजित सैन्य भरतीसाठी मोठ्या संख्येने बेळगावमध्ये येत असलेल्या परराज्यातील धाडसी युवकांचे पोटापाण्याचे होणारे हाल लक्षात घेऊन स्थानिक फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम (एफएफसी), पॉलिट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईड आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ यांनी संयुक्तरीत्या मदतीचा हात देताना त्या युवकांना जेवणाचे वाटप करण्याच्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
प्रादेशिक सेनेतील रिक्त पदांसाठी गेल्या 4 नोव्हेंबरपासून बेळगावमध्ये लष्कर भरती प्रक्रिया सुरू आहे. कॅम्प येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदानावर भरतीच्या ठिकाणी कर्नाटकसह गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील युवक भरतीसाठी येत आहेत.
मात्र यापैकी बरेच जण गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना खर्चाचा ताळमेळ घालूनच पोटापाण्याची व्यवस्था करावी लागत होती. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या अनेकांची जेवणाअभावी परवड होत आहे. याची दखल घेत फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम (एफएफसी), पॉलिट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईड आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ यांच्यातर्फे सीपीएड मैदान आणि बेळगाव रेल्वे स्थानक याठिकाणी 2,500 हून अधिक युवकांना काल दुपारी तसेच रात्री 11:30 वाजेपर्यंत पुलाव वाटप करण्यात आले.
सदर उपक्रम राबविण्यासाठी संतोष दरेकर, किरण निप्पाणीकर, विजय भद्रा, शैलेश कावेडिया, मिलिंद पाटणकर, गणेश रोकडे, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, पार्थ भोसले, साईराम जहागीरदार, डॉ. रोहित जोशी, व्हिक्टर फ्रान्सिस, राजू टक्केकर आदींसह कॅम्प पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.
या सर्वांना सहाय्यक पोलिस आयुक्त शेखरप्पा यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी केवळ अन्न वितरण स्थळांना भेट देऊन फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम, पॉलिट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईड आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली आणि जेवण उपलब्ध करण्यास मदत केली.