बेळगाव लाईव्ह :रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांनी शहराच्या हद्दीत अवजड वाहनांवर सुधारित निर्बंध जारी केले आहेत.
शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिना मार्बन्यांग यांच्या आदेशानुसार 3 टनांपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांची वाहतूक आता सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरी भागात प्रवेश करण्यास प्रतिबंधित असणार आहे.
सदर निर्बंध केंद्रीय मोटार वाहन कायदा 1938 च्या कलम 115, वाहन नियम 221-ए(5) आणि कर्नाटक वाहतूक नियंत्रण कायदा 1960 अंतर्गत बेळगाव महापालिका आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रांसह शहरातील सर्व रस्त्यांवर लागू असतील.
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग-4 या निर्बंधातून मुक्त असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची ने -आण करणाऱ्या बसेस, दुधाचे ट्रक, पेट्रोल उत्पादने वाहून नेणारी वाहने, शहरी वाहतूक आणि कापणीच्या काळात ऊस वाहतूक करणारी ट्रक वगैरे वाहने, अत्यावश्यक सेवा वाहनांना हे निर्बंध लागू नसतील.
त्याचप्रमाणे शहरातील प्रवेश निर्बंधाच्या कालावधीत फळे आणि भाजीपाला वाहून नेणाऱ्या 3 टन वजनाच्या हलक्या वाहनांनाही शहराच्या हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी असेल.
हे सुधारित वेळापत्रक सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 आणि दुपारी 4:00 वा. ते रात्री 8:00 या पूर्वीच्या निर्बंधच्या वेळेत बदल करणारे तसेच कमाल गर्दीच्या कालावधीत रहदारी नियमन सुनिश्चित करण्यासाठी अंमलात आणले जात आहे.