बेळगाव लाईव्ह: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे अलारवाड परिसराकडून सुरू झालेले काम आज सलग तिसऱ्या दिवशी सुरूच राहिले असले तरी माधवपुर शिवाराच्या ठिकाणी मात्र या कामाला शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकरी आक्रमक झाल्यामुळे यंत्रसामग्री घेऊन सपाटीकरणासाठी आलेल्या कामगारांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कंत्राटदाराच्या लोकांना माधवपूर शिवारातून हुसकावून लावल्यानंतर बोलताना शेतकरी नेते राजू मरवे यांनी हा हालगा -मच्छे बायपास रस्ता बेकायदेशीररित्या होत असल्याचे सांगून त्यामुळे कशा पद्धतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत, आपल्या जीवाला मुकत आहेत त्याची माहिती दिली.
तसेच सदर बायपासचा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. बायपासच्या धास्तीने काल निधन पावलेल्या जुने बेळगाव येथील यल्लाप्पा चन्नाप्पा टपाले या शेतकऱ्याची या ठिकाणी अवघी 10.5 गुंठे शेतजमीन आहे. ही संपूर्ण जमीन बायपाससाठी संपादित केली गेली तर टपाले कुटुंबीय पोटाला काय खाणार? या चिंतेतूनच यल्लाप्पा याचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी देखील मच्छे येथील एका युवा शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे हालगा येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्याला स्मृतिभ्रंश होऊन वेड लागले आहे.
याखेरीज बायपाससाठी आपली शेत जमीन जाणार हे धक्का सहन न होऊन आमच्या रयत गल्लीतील एक महिला घरातून बेपत्ता झाली आहे. तेंव्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या भागातील शेतकऱ्यांच्या भवितव्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हालगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करावा. विकासाला आम्हा शेतकऱ्यांचा आक्षेप नाही.
विकास जरूर झाला पाहिजे परंतु तो करताना शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. कर्नाटक सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून अस्तित्वात असल्यामुळे त्यांनी या बायपासचा विषय गांभीर्याने घेऊन तो रद्द करावा अशी मागणी या भागातील समस्त शेतकऱ्यांच्यावतीने मी करत आहे, असे राजू मरवे यांनी शेवटी सांगितले.