Friday, November 15, 2024

/

हालगा मच्छे बायपासचा आणखी एक बळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जुने बेळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी यल्लाप्पा चन्नाप्पा टपाले (वय 65) याचे काल बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी झालेले निधन म्हणजे हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला आणखी एका शेतकऱ्याचा बळी आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

शेतकरी नेत्यांपैकी राजू मरवे यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 2011 पासून आजपर्यंत बेकायदेशीरपणे तसेच शेतकऱ्यांची सहमती न घेता, त्यांचा विरोधी आंदोलन मोडित काढत मा. न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पोलिस खात्याच्या मदतीने हालगा-मच्छे बायपास करण्यात गुंतले आहे.

दुसरीकडे गेल्या 2011 पासून ते आजपर्यंत या पट्ट्यातील अनेकांनी बायपास रस्त्यामुळे आपल्या सुपीक जमिनी याची प्रचंड धास्ती घेतली असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपवले आहे. मच्छे येथील युवा कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कांही शेतकरी व महिला डोक्यावर परिणाम झाल्यामुळे सैरभैर होऊन वेडे होत आपल घरही सोडून गेले आहेत. त्याची पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल झाली आहे.

आता पुन्हा गेल्या कांही दिवसापासून न्यायालयात दावा प्रलंबीत असतानांही तिकडे दुर्लक्ष करत ठेकेदारने हालगा -मच्छे बायपासचे काम सुरु केल्याने जूनेबेळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी यल्लाप्पा चन्नाप्पा टपाले (वय 65) याचे काल बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी निधन झाले. बायपास रस्त्यामुळे आपल्या शेतातील लावले पीक तर जाणारच, अत्यंत कष्टाने सांभाळलेली वडिलोपार्जित शेती आपल्या हयातीत आपण घालवणार या धास्तीने आणि पूढे काय खाणार? अशा घोराने यल्लाप्पा याने अंथरूण धरले होते.Halga machhe bypass

त्यामुळे त्याचे निधन म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच त्याचा बळी घेतला यात तिळमात्र शंका नाही. कारण त्यांची पत्नी बायपास विरुद्धच्या लढ्यात शेतकऱ्यासमवेत प्रत्येक आंदोलनातच नव्हे तर उच्च न्यायालयात दावा असताना सुनावनीवेळी जातिने हजर रहात असे. ही शेतकरी महिला आपले शेत सांभाळत पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात पॉवरलूमवर काम करुन आपला उदरनिर्वाह चालवते. कारण फक्त शेतीवर घर चालन कठिण होत. मात्र आता यल्लाप्पा यांच्या निधनामुळे ती एकाकी पडली असून बायपासमधील जमीनीचा तुकडाच यांच्या जीवनाचा आधार आहे. मुलं नसल्याने हलाखीचे जीवन जगणारी यल्लाप्पाची पत्नी माझ्या नवऱ्याचा बळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच घेतला असे सांगते.

तेंव्हा आतातरी प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास प्रकल्प रद्द करणार? कि असे अनेक बळी गेले तरी चालतील पण बायपास करणारच या मुजोरीत वागणार? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.