Saturday, November 23, 2024

/

चित्रकला वृद्धिंगत व्हावी यासाठी गुलमोहर बागचे “ट्रँक्विल ब्लूज”

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गुलमोहर बाग या बेळगावातील कलाकारांच्या समूहातर्फे टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या कला महर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये आयोजित “ट्रँक्विल ब्लूज” नावाच्या कला प्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू असून उद्या गुरुवार दि. 14 नोव्हेंबर हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

सदर पाच दिवसांच्या या प्रदर्शनाला गेल्या रविवारी प्रारंभ झाला असून प्रदर्शनामध्ये निळ्या रंगावर आधारित विविध प्रकारच्या आकर्षक कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. गुलमोहर बागच्या अजित हुलमणी, रोहितराज पाटील, शिरीष देशपांडे, अमित नार्वेकर, प्रशांत बिसुरे, जे. डी. सुतार, शिल्पा खडकभावी, सचिन उपाध्ये, अंजली पवार, कल्पना कुलकर्णी, सुरेंद्र पाटणकर, मधुसूदन महाले, सुषमा भट, वाणी हिरेमठ, वासंती लगाली, सी. ए. रांगणेकर, पद्मप्रिया, नंदा पाटील, चंद्रशेखर करगांवकर, शिवाजी बेकवाडकर आदी 29 कलाकारांच्या कलाकृती “ट्रँक्विल ब्लूज” प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

आपल्या कलाकृती संदर्भात शिरीष देशपांडे, प्रशांत बिसुरे आदी कलाकारांनी आज बुधवारी बेळगाव लाईव्हशी बोलताना आपल्या कलाकृतीबद्दल माहिती देऊन त्यांचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. शिरीष देशपांडे यांनी या प्रदर्शनाच्या निमित्ताने शालेय मुलांसाठी गेल्या 10 नोव्हेंबर रोजी आयोजित पेंटिंग स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि होतकरू युवा चित्रकारांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम उद्या प्रदर्शनाच्या सांगता समारंभाप्रसंगी होणार असल्याची माहिती दिली.

सदर प्रदर्शनामध्ये दररोज सायंकाळी 4 वाजता अनुक्रमे मधुसूदन महाले, महेश होनुले आणि शिल्पा खडकभावी या कलाकारांकडून चित्रकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आपले प्रात्यक्षिक सादर सादर केल्यानंतर बोलताना शिल्पा खडकभावी यांनी सदर प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन गेल्या रविवारी माजी खासदार मंगला अंगडी, बेळगावचे प्रख्यात कलाकार फिरदोश मोदी आणि प्रसिद्ध वास्तुविशारद सुश्री माधुरी गुलाबानी यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगून प्रदर्शनाबद्दल माहिती दिली.Gulmohor bagh

सीसीआरटी दिल्ली या संस्थेत कार्यरत ज्येष्ठ कलाकार जयवंत सुतार यांनी गेली 22 वर्षे आपण कला विश्वातील संशोधक म्हणून काम करत असल्यामुळे आपल्याला भारतभर भ्रमंती करण्यास मिळाल्याचे सांगितले त्यामुळे प्रत्येक ठिकाणची कला, स्थापत्यशास्त्र आणि प्रत्येक ठिकाणची लोककला आम्हाला पाहायला मिळाली. त्यानुसार त्यामध्ये संशोधन करून आम्ही देशभर त्याचा प्रचार केला. उदाहरणार्थ रांगोळी भारतीय स्थापत्य, रंग या सर्व गोष्टी सीसीआरटीतर्फे सर्व शाळांमध्ये मोफत पुरवल्या जातात गुलमोहर बागबद्दल बोलायचे झाल्यास आम्ही या ठिकाणी वर्षातून तीन -चार प्रदर्शनी भरवतो असे सांगून त्याबद्दलची आणि गुलमोहर बाग संस्थेबद्दलची माहिती दिली.

तसेच आमचा पुढचा प्रकल्प हा अलीकडे शाळांमधून चित्रकला विषयाला कमी महत्त्व दिले जात आहे त्यावर केंद्रित असणारा असून ही कला अधिकाधिक कशी वृद्धिंगत व्हावी? त्यासाठी काय करावे लागेल? यावर चर्चा घडवून आणली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाला विषय दिला जाईल, असेही जयवंत सुतार यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.