बेळगाव लाईव्ह:महांतेशनगर येथे काल बुधवारी रात्री अज्ञातांनी एका युवकावर गोळीबार करण्याची घटना ही प्रेम प्रकरणातून घडली असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली.
शहरातील पोलीस आयुक्तालयामध्ये आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आयुक्त मार्बन्यांग यांनी सांगितले की, महांतेशनगर येथे काल बुधवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत एका युवकाच्या पायाला गोळी लागून इजा झाली आहे.
दोघा प्रेमी युगलांच्या प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे. प्रेम प्रकरणामुळे निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी जखमी युवक व अन्य कांही जण महांतेशनगर येथे घटनास्थळी जमले होते. त्यावेळी चर्चेचे पर्यवसान मुलीकडच्या लोकांनी युवकावर गोळीबार करण्यामध्ये झाले.
या गोळीबारात युवक जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. गोळीबार केलेल्या बंदुकीच्या पुंगळ्या देखील सापडल्या आहेत अशी माहिती देऊन जखमी युवकावर बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नांव प्रणितकुमार (वय 31) असे असून तो द्वारकानगर टिळकवाडी येथील रहिवासी आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जखमी प्रवीणकुमार याने आपल्या सोबत गोळीबार झालेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या दोन पुंगळ्याही आणल्या होत्या. गोळीबाराची घटना काल बुधवारी रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग व उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तसेच पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी हॉस्पिटलमध्ये जखमी तरुणाची भेट घेऊन घटनेबद्दल माहिती जाणून घेतली होती. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत या प्रकरणाची चौकशी केली.