बेळगाव लाईव्ह:स्वतःला शेतकरी, शेतकऱ्यांचे पाठीराखे म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रथम राज्यामध्ये डाॅ. स्वामीनाथन अहवालाच्या अंमलबजावणीसह एपीएमसी व भूसंपादन कायद्यातील दुरुस्ती वगैरे शेतकऱ्यांच्या प्रमुख पाच मागण्यांची पूर्तता करूनच बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन घ्यावं, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरितसेनेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी दिली.
बेळगाव एपीएमसी यार्ड येथील भाजी मार्केटच्या ठिकाणी आज सोमवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. शेतकरी नेते प्रकाश नायक म्हणाले की, बेळगावमध्ये येत्या 9 डिसेंबर पासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. यानिमित्ताने कर्नाटक सरकार किंवा केंद्र सरकार यांनी जे कांही शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणले आहेत ते मागे घेतले जावेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतःला शेतकरी, शेतकऱ्यांचे पाठीराखे म्हणून घेणारे आणि कायद्याच्या चौकटीत काम करणारे समजतात. पूर्वी विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांनी आपण सत्तेवर येताच भू -सुधारणा कायदा दुरुस्ती रद्द करू, असे आश्वासन दिले होते.
मात्र राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येऊन दोन वर्षे झाली तरी त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्याचप्रमाणे एपीएमसी कायद्यात दुरुस्ती करून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असलेली मध्यवर्तीय व्यवस्था काढून टाकावी. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन कायदा राबवून मध्यस्तांचा फायदा करून देणे बंद करावे. भूसंपादनावेळी शेतकऱ्यांना तत्कालीन बाजारभावाप्रमाणे त्यांच्या जमिनीचा दर दिला जावा. देशहितासाठी संविधान असल्यामुळे वक्फ बोर्डाचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत.
बेळगाव आणि संकेश्वरसह राज्यात ठीकठिकाणी स्थापन झालेल्या 5 -6 खाजगी एपीएमसी शेतकरी विरोधी आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही भांडवलशाही व्यवस्था आहे. डॉ. स्वामीनाथन अहवालानुसार सरकारच्या एपीएमसीमध्ये कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला गेला पाहिजे. याची अंमलबजावणी सरकारकडून झाली पाहिजे.
तेंव्हा स्वतःला शेतकरी, शेतकऱ्यांचे हितरक्षक समजणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यामध्ये डाॅ. स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणीसह मी सांगितलेल्या मागण्यांची पूर्तता करूनच बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन घ्यावं. अधिवेशनाच्या नावाखाली मौजमजेसाठी बेळगावला न येता सदर अधिवेशनामध्ये बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या विकासासंदर्भात निर्णय घेतले जावेत. या अधिवेशनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी त्या पैशाचा जनतेला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विनियोग करावा असे सांगून बेळगावातील जय किसान होलसेल भाजी मार्केट हे खाजगी मार्केट संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे नाईक यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे बेळगाव एपीएमसी यार्डामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नव्या भाजी मार्केट इमारतीला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्याद्वारे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी शेवटी राष्ट्रीय शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी केली.