बेळगाव लाईव्ह : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील रुद्रेश यडवन्नावर नामक द्वितीय दर्जा कारकूनाने (एसडीसी) कार्यालयामधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून त्यामुळे तहसीलदार कार्यालय हादरून गेले आहे.
याप्रकरणी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, तहसीलदार कार्यालयात उघडकीस आलेल्या आत्महत्याप्रकरणी पोलीस तपास करायला हवा.
सदर कार्यालयात आपल्यावर अन्याय झाल्याची नोंद मृत रुद्रेश यडवन्नावर यांनी डेथनोटमध्ये लिहून ठेवली असून एका मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव देखील यात नोंद करण्यात आले आहे.
याप्रकरणी तपास अधिकारी योग्य तो तपास घेतील, संशयितांची चौकशी करतील, दोषींवर कारवाईदेखील करतील. याप्रकरणी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव पुढे आले आहे, मंत्र्यांचे नव्हे. त्यामुळे मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची चौकशी आणि तपास केला जाईल.
या प्रकरणानंतर सकाळपासून पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून पोलीस तपास सुरु आहे. मी तपास अधिकारी नाही, परंतु पोलीस तपासात, चौकशीअंती सत्याचा उलगडा होईल, पोलीस तपासाअंती सर्व काही स्पष्ट होईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.