बेळगाव लाईव्ह : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत डॉक्टरांना जबाबदार धरले. महिलेच्या मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी रुग्णालयासमोर निदर्शनाने करत जबाबदार डॉक्टरांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
कल्पना अनिल लमानी (वय 29) असे त्या महिलेचे नाव असून सदर महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. पण प्रसूती दरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ती सौंदत्ती तालुक्यातील हलकी तांडा येथील रहिवासी आहे. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी प्रसूती वॉर्डच्या बाहेर जमून डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
प्रसूतीनंतर दुपारी कल्पनाची तब्येत चांगली होती. मात्र, सायंकाळी अचानक तिचा मृत्यू झाला. रक्तदाब कमी झाल्याने कल्पनाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रसूतीनंतर डॉक्टरांनी तिच्यावर योग्य उपचार केले नाहीत. डॉक्टरांचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
जिल्हा रुग्णालयाचे प्रसूती व बालरोग विभागाचे संचालक डॉ. अशोक शेट्टी येताच कल्पनाच्या कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलच्या दारात घेराव घातला. आमच्या मुलीच्या मृत्यूला न्याय मिळाला पाहिजे, आमच्यासारखी परिस्थिती कुणाचीही होऊ नये.
निष्काळजी डॉक्टरला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना डॉ. अशोक शेट्टी तीन जणांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करणार आहेत. दोषी डॉक्टरांवर पोलिस गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रकरणी एफआयआर नोंद केला आहे.