बेळगाव लाईव्ह : अखेर बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली असून अध्यक्षपदी रायबागचे अप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
आज सकाळपासूनच संचालकांची मोर्चेबांधणी सुरु झाली होती. बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये सर्व संचालकांसह आम. भालचंद्र जारकीहोळी, डीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार रमेश कत्ती यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यादरम्यान इच्छुक उमेदवार देखील एकाच वाहनातून आल्याने हि निवडणूक बिनविरोध पार पडणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. यानुसार अपेक्षेप्रमाणे हि निवडणूक बिनविरोध पार पडली असून यावेळी बँकेचे संचालक अण्णासाहेब जोल्ले, महांतेश दोड्डगौडर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आम. रमेश जारकीहोळी आदींचीही उपस्थिती होती.
अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी तब्बल एक तासाहून अधिक काळ खाजगी हॉटेलमध्ये बैठक सुरु होती. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत संचालकांसह विरष्ठांना विश्वासात घेत रायबागमधील काँग्रेस नेते अप्पासाहेब कुलघोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा पुढील अडीच वर्षांसाठी असेल
रमेश कत्ती यांच्या राजीनाम्यदरम्यान डीसीसी बँकेच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले होते. नाराजी नाट्यामुळे अनेक संचालकांनी अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच रमेश कत्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्या रिक्त पदावर निवड करण्यासाठी आज निवडणूक घेण्यासंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. यानुसार आज सर्वसंमतीने डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदावर अप्पासाहेब कुलघोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.