बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या कंत्राटदाराकडून चिरमुरे डेपोमध्ये कचरा न टाकता तो शहरानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या शेजारी हलगा पूल ते बळ्ळारी नाला सर्व्हीस रोडच्या बाजूला टाकून अस्वच्छता पसरवली जात आहे. तरी महापौर आणि मनपा आयुक्तांनी या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी या भागातील त्रस्त शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
बेळगावतील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या शेजारी रात्रीच्या वेळी महानगरपालिका कंत्राटदाराच्या गाडीतून चिरमुरी डेपोला कचरा न टाकता हलगा पूल ते बळ्ळारी नाला हायवेच्या सर्व्हीस रोडच्या बाजूला कचरा टाकल्याचे दिसून येत आहे.
अलारवाड ब्रिज जवळील युवराज हॉटेलच्या बाजूला सर्व्हिस रस्त्यावर माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या शेतीच्या बांधावर रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणच्या ब्रिजच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर अशाच प्रकारे कचरा टाकण्यात येत आहे. या ठिकाणी अनेकवेळा मृत जनावरे सुद्धा आणून टाकण्यात येत असतात.
परिणामी अस्वच्छतेसह या भागात मोठी दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना फार मोठा त्रास -मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी बेळगावच्या महापौर व महानगरपालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी. तसेच प्रत्यक्ष पाहणी करून टाकलेला कचरा तेथून ताबडतोब हटवण्याचा आदेश द्यावा..
तसेच पुन्हा सदर ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये यासाठी कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराला चांगली समज द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे.