बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि तालुक्यात थंडीची तीव्रता वाढली असून, नागरिकांनी गारठ्यापासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळीच्या सुरुवातीपासूनच थंडीची तीव्रता जाणवू लागली असून सकाळी उष्णता असूनही पहाटे आणि रात्रीच्या वेळी होणारा गारठा लोकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे.
दिवाळीपासून थंडीला सुरुवात होते. मात्र यावर्षी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे थंडी गायब झाली होती. तर मध्यंतरी पाऊसही कोसळला होता.
त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार थंडी पडण्यास सुरुवात झाली असून पारा घसरल्याने साऱ्यांनाच हुडहुडी भरली आहे. बेळगाव शहरात आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसात तापमानात बदल झाला असून तापमान कमी झाल्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.
रात्रीच्या गारठ्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण मिळविण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून विशेषतः ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
थंडी पडल्याने कडधान्य पिकाला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीला जोरदार सुरुवात झाली आहे. थंडीमुळे बाजारपेठेमध्येही रात्री 9 नंतर शुकशुकाट पसरत आहे.
नदी, नाले या ठिकाणी तर अधिकच थंडी जाणवत आहे. या थंडीमुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच थंडीमुळे काजू, आंबा या पिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. थंडी पडत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
थंडीमुळे बेळगावच्या बाजारपेठेत उबदार कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक उबदार कपडे, स्वेटर्स, आणि ब्लँकेट्स मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी भर देत असून विक्रेत्यांना वाढत्या मागणीचा फायदा होत आहे.