बेळगाव लाईव्ह :सोसायटीमध्ये ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतरही ती ठेव ग्राहकाला परत करण्यास नकार देणाऱ्या मुरगोड (ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) येथील श्री शिवचिदंबरेश्वर अर्बन को -ऑप क्रे. सोसायटी लि.च्या अध्यक्षांसह पाच संचालकांना बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाने प्रत्येकी 1 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
श्री शिवचिदंबरेश्वर अर्बन को -ऑप क्रे. सोसायटी लि. अध्यक्ष चिदंबर कृष्णाजी तोरगल, संचालक
निंगनगौडा मल्लिकार्जुन पाटील, पांडुरंग रामराव जोशी, महांतेश धरेप्पा अलाज, अशोक शामराव देशपांडे आणि सरोजिनी गंगाप्पा कंगेरी अशी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, कंगेरी ओनी मुरगोड (ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) येथील रंगव्वा यल्लाप्पा करगण्णावर आणि यल्लाप्पा यमनाप्पा करगण्णावर यांनी श्री शिवचिदंबरेश्वर अर्बन को-ऑप क्रे. सोसायटी लि.मध्ये 15 लाख रुपयांची ठेवली होती.
सदर 2021 साली ठेवलेल्या ठेवीची मुदत 2022 मध्ये समाप्त झाल्यामुळे करगण्णावर आपले पैसे परत घेण्यासाठी गेले असता सोसायटीने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे रंगव्वा आणि यल्लाप्पा करगण्णावर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तेंव्हा ग्राहक न्यायालयाने करगण्णावर यांच्या ठेवीची रक्कम दोन महिन्यात परत करण्याचा आदेश श्री शिवचिदंबरेश्वर सोसायटीला दिला. मात्र तरी देखील सोसायटीने ठेवीची रक्कम परत केली नाही.
त्यामुळे करगण्णावर यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल सोसायटीविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता.
या खटल्याची अंतिम सुनावणी गेल्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी होऊन बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाने श्री शिवचिदंबरेश्वर अर्बन को -ऑप क्रे. सोसायटी लि. मुरगोडचे अध्यक्ष आणि संचालकांना प्रत्येकी 1 वर्षाचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्यायग्रस्त तक्रारदार रंगव्वा करगण्णावर आणि यल्लाप्पा करगण्णावर यांच्यावतीने ॲड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले.