बेळगाव लाईव्ह : प्लास्टिक बंदी असतानाही 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या शहरातील दुकांनातून विकल्या जात असल्याचे निदर्शनात आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई राबवत शहरातील विविध भागांमध्ये तपासणी करून 250 किलो प्लास्टिक जप्त करत 12 दुकानदारांकडून 5,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या आदेशानुसार सदर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त शहरात वॉर्डनिहाय आढावा घेत आहेत, यादरम्यान त्यांनी शहरभरात साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी कडक सूचना दिल्या.
सोमवारी सकाळी टेंगिनकेरा गल्ली, रविवार पेठ, मेणसे गल्ली, पांगूळ गल्ली यांसारख्या प्रमुख भागांमध्ये प्लास्टिक पिशव्या विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने तपासली.
या तपासणी दरम्यान, 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विकल्या जात असल्याचे आढळले, त्यावर त्वरित कारवाई करण्यात आली.
या कारवाईला महापालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीरतेने हात घातला आहे. शहरातील प्लास्टिक कचऱ्याचा धोका लक्षात घेत महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र केली आहे.