बेळगाव लाईव्ह – जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी च्या माध्यमातून दरवर्षी बालदिन सन्मान पुरस्काराचे वितरण केले जाते. याही वर्षी बाल दिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
स्व.श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिले जाणारे हे पुरस्कार यंदा महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रकाश सांबरेकर आणि भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल किसन औशीकर यांना प्रदान करण्यात आले.
सुवर्ण लक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पायोनियर बँकेचे संचालक व जायंट्स इंटरनॅशनल चे विभागीय संचालक अनंत लाड यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि श्यामची आई पुस्तक भेट देऊन अनंत लाड यांनी हे पुरस्कार वितरित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील या होत्या तर व्यासपीठावर सुवर्ण लक्ष्मीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर ,सौ मनीषा मोहन कारेकर व सखीच्या विद्या सरनोबत या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सखीच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला.
“गेल्या आठ वर्षात जायंट्स सखीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पडली आहे. इतर संघटना पेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा मानस ठेवून या संस्थेचे कार्य सुरू आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असून समाज त्यांच्या पाठीशी नेहमीच उभा आहे हे लक्षात घेऊन महिलांनी कार्यरत राहण्याची गरज आहे” असे विचार यावेळी बोलताना अनंत लाड यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप विद्या सरनोबत यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सूत्रसंचालन सौ मधुरा शिरोडकर यांनी केले कार्यक्रमास मोहन कारेकर, नम्रता महागावकर, चंदा चोपडे, शीतल पाटील, अर्चना कंगराळकर, दीपा पाटील, स्वाती फडके यांच्यासह अनेक सुवर्णलक्ष्मीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते