बेळगाव लाईव्ह:टिळकवाडी, बेळगाव येथील बालिका आदर्श शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी हिला कर्नाटक राज्य सरकारच्या ‘केळदी चन्नम्मा शौर्य पुरस्कारा’ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
बेंगलोर येथील जवाहर बाल भवन येथे काल शुक्रवारी ‘बालदिन-2024’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते स्फूर्ती हिला उपरोक्त शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वीरबाला स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी हिने गेल्या 22 ऑगस्ट रोजी रात्री 8.45 च्या सुमारास काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे फाटकानजीक रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी जाणाऱ्या महिला आणि दोन मुलांचा जीव वाचविला होता.
स्फूर्तीने प्रसंगावधान राखून त्या तिघांचेही प्राण वाचविले होते. तिने दाखविलेल्या साहसाची दखल घेऊन महिला व बालकल्याण खात्याने तिला यंदाचा ‘केळदी चन्नम्मा शौर्य पुरस्कार’ जाहीर केला होता. पुरस्काराचे वितरण काल शुक्रवारी बंगलोर येथे पार पडले.
बेळगाव जिल्ह्यातून स्फूर्ती सव्वाशेरी ही एकमेव विद्यार्थिनी या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे. पुरस्कार प्रदान केल्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्फूर्तीचे कौतुक करताना ‘ही आमच्या बेळगावची मुलगी’ असे म्हणत पाठ थोपटली.
तिघांचा जीव वाचवल्याबद्दल स्फूर्ती हिला यापूर्वी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नार्थतर्फे ‘ब्रेव्हरी अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. शौर्य पुरस्कार देत बेळगाव लाईव्ह च्या वतीने देखील स्फूर्तीचा सन्मान करण्यात आला होता.