बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या वतीने बेळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “सीईटी सक्षम” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले जात असून या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले अनुदान “चॅलेंज फंड” या योजनेंतर्गत सरकारने उपलब्ध करून दिले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आगामी “सीईटी” आणि “नीट” परीक्षांसाठी तयार करण्यासाठी शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १० लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
यासंदर्भात बेळगाव जिल्हा पंचायतिचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले की, “सीईटी सक्षम” उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक संधी प्रदान करणे आणि त्यांना सीईटी आणि नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी सक्षम बनवणे आहे.
यासाठी, जिल्हा पंचायत आणि पदवीपूर्व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा उपक्रम राबविला जात आहे. “सीईटी सक्षम” हा एक अभिनव कार्यक्रम आहे, जो सरकारी विज्ञान पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत, प्रत्येक महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी, सीईटी आणि नीट परीक्षांसाठी तयारी चाचण्या घेतल्या जातात.
यासाठी “चॅलेंज फंड” योजनेंतर्गत सरकारने “सीईटी सक्षम” उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी १० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या कार्यक्रमात एक विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याचे धोरण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे संकलन करून त्याचे विश्लेषण करणे शक्य होईल. यामुळे सीईटी आणि नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक चांगले मार्गदर्शन मिळू शकते.
“सीईटी सक्षम” हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांना परीक्षा तयारीसाठी सक्षम करत नाही, तर भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांचे मानसिक आणि शारीरिक बळ वाढवण्यास मदत करतो. शिमोगा, विजयपूर आणि इतर जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी या मॉडेलला पाहण्यासाठी बेळगावला भेट दिली आणि त्याची माहिती घेतली आहे. बेळगाव जिल्ह्यात राबविलेला हा अभिनव कार्यक्रम संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अधिक फायदेशीर ठरणार असून बेळगावच्या शैक्षणिक प्रगतीत नक्कीच भर टाकणारा आहे.