बेळगाव लाईव्ह :भगवान येशू ख्रिस्त अर्थात ख्रिस्त राजाच्या सणाच्या निमित्ताने बेळगावच्या कॅथलिक समुदायातर्फे आयोजित धार्मिक मिरवणूक आज रविवारी सायंकाळी भक्तीभावाने पार पडली.
बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मिरवणुकीला कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथून दुपारी 4 वाजता सुरुवात झाली.
या मिरवणुकीत बेळगाव शहरासह आजूबाजूच्या प्रदेशातील ख्रिश्चन धर्मगुरू, नन्स, स्त्री-पुरुष आणि मुले अशा सुमारे 1500 लोकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मिरवणुकी दरम्यान या सर्वांकडून प्रार्थना व भक्ती गीतांच्या माध्यमातून भगवान येशू ख्रिस्ताची स्तुती केली जात होती.
सदर शिस्तबद्ध मिरवणूक कॉन्व्हेंट रोड, ग्लोब थिएटर, खानापूर रोड, ध. संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड, वनिता विद्यालय मार्गे मार्गक्रमण करत सेंट झेवियर्स हायस्कूल परिसरातील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च आवारामध्ये समाप्त झाली.
याप्रसंगी बोलताना बिशप डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी आपल्या प्रवचनात लोकांना एकमेकांची, विशेषतः गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. “येशूचे राज्य या जगाचे नाही. तो स्वर्गीय राजा आहे जो म्हणाला, ‘माझ्या सर्वात लहान भावांसाठी जे काही कराल ते तुम्ही माझ्यासाठी करता’. त्याचे राज्य प्रत्येकाला एकमेकांची सेवा करण्यास बोलावते म्हणून आपण एकमेकांची सेवा करूया” असे आवाहन करून पवित्र बायबलचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की देवाने जग निर्माण केले आणि ते मानवाला राज्य करण्यासाठी आणि वापरण्यासाठी दिले.
“परंतु मनुष्याने त्याचा गैरवापर करून सध्याच्या स्थितीत आणले आहे. जर आपण देवाच्या वचनानुसार जगलो तरच आपण ते मूळ उत्तम स्थितीत आणू शकतो. सर्वजण शांती, प्रेम आणि बंधुभावाने जगूया”, असे प्रतिपादन बिशप डॉ. फर्नांडिस यांनी शेवटी केले.