बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारच्या हमी योजनांचा करिष्मा चन्नपट्टण, संडूर, शिग्गावी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत दिसून आला असून तिन्ही मतदार संघात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला आहे. काँग्रेसच्या विजयामुळे एनडीएला मोठा धक्का बसला आहे.
चन्नपट्टण पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सि. पी. योगेश्वर यांनी भाजपाचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांचा पराभव केला. तर शिग्गावी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यासीर खान पठाण यांनी भाजपाचे उमेदवार भरत बोम्मई यांना पराभूत केले.
याचप्रमाणे संडूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या अन्नपूर्णा तुकाराम यांनी एनडीएच्या उमेदवार बंगारू हनमंथा यांचा पराभव केला. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार निखिल कुमारस्वामी, भरत बोम्मई आणि बंगारू हनमंत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चन्नपट्टण पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेरीत निखिल कुमारस्वामी पुढे होते, परंतु नंतर सि. पी. योगेश्वर यांनी २५४१३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. अखेरच्या फेरीत सि. पी. योगेश्वर यांनी ११२,६४२ मतं मिळवली, तर निखिल कुमारस्वामी ८२,२२९ मतांसह पराभूत झाले. शिग्गावी मतदारसंघात सुरुवातीला भरत बोम्मई ८०० मतांच्या फरकाने पुढे होते, परंतु नंतर यासीर खान पठाण यांनी १३,४२८ मतांच्या फरकाने विजय मिळवला.
अखेरच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसला ८३,४०० मतं मिळाली, तर भाजपाला ६९,९७२ मतं मिळाली. संडूर पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेरींमध्ये अन्नपूर्णा तुकाराम आघाडीवर आघाडीवर होते . अखेरच्या फेरीत काँग्रेसने ९,६४९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. अन्नपूर्णा तुकाराम यांनी ९३,६१६ मतं मिळवली, तर भाजपाला ८३,९६७ मतं मिळाली.
या तीनही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने प्रभावी विजय मिळवला असून एनडीएला मोठा धक्का बसला आहे. पोटनिवडणुकीत समोर आलेल्या निकालानंतर कर्नाटकात हमी योजनांचा करिश्मा चांगलाच लोकप्रिय ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.