बेळगाव लाईव्ह : : बेळगावमधील तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेले शासकीय अधिकारी रुद्रेश यडवण्णावर यांच्या कुटुंबाला भाजप शिष्टमंडळाने भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले. भाजपचे उपाध्यक्ष अरविंद बेल्लद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रुद्रेशची आई मल्लवा आणि पत्नी गिरिजा यांना, न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप शिष्टमंडळाशी बोलताना मृत रुद्रेश यांची पत्नी गिरिजा यांनी सांगितले की, आपल्या पतीने कार्यालयात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल, अन्यायाबद्दल आपल्याशी अनेकवेळा चर्चा केली होती. सोमवारी व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज केला होता, त्यावर त्यांनी फोन करुन अधिकाऱ्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी अचानक त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.
रुद्रेश यडवण्णावर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अरविंद बेल्लद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढली आहे.
पीएसआय परशुराम आत्महत्या प्रकरणाचाही उलगडा झाला नाही. आता बेळगावमधील सरकारी अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणीही दिरंगाई होत आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे.
मृत रुद्रेश यडवण्णावर यांच्यावर कोणत्या गोष्टीचा दबाव होता हे शोधणे गरजेचे आहे. डेथ नोट मध्ये नावे नोंद असलेल्या व्यक्तींना अटक करणे गरजेचे आहे. याप्रकरणी मंत्री मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या स्वीय सचिवांचे नाव पुढे आले असून मंत्र्यांच्या आदेशानुसारच स्वीय सचिव काम करतात, त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.