बेळगाव लाईव्ह:भारतीय जनता पक्षातर्फे उद्या रविवार दि 1 डिसेंबर 2024 रोजी शहरात वक्फ कायद्याच्या विरोधात जनजागृती मोहीम राबविली जाणार असून यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्ष बेळगावच्यावतीने भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी पोलीस आयुक्तालयामध्ये शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांना वक्फ कायदा विरोधातील जनजागृती आंदोलनची कल्पना देणारे व त्या आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठीचे निवेदन सादर करण्यात आले.
भारतीय जनता पक्षातर्फे वक्फ कायद्याच्या विरोधात उद्या रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जनजागृती जनजागृती मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी परवानगी दिली जावी. सदर मोहीम विजयपूरचे आमदार बसनगौडा रामनगौडा यत्नाळ, गोकाकचे आमदार रमेश लक्ष्मणराव जारकीहोळी, म्हैसूरचे माजी खासदार प्रताप सिंह, दावणगिरीचे माजी लोकसभा सदस्य जे. एम. सिद्धेश्वर, माजी आमदार अरविंद लिंबावळी, माजी आमदार कुमार बंगारप्पा, हरिहरचे आमदार बी. पी. हरीश भाजप नेते एन. आर. संतोष, किरण जाधव आणि मृगेंद्रगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविली जाणार आहे.
जनजागृती अंतर्गत उद्या दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कॉलेज रोड, बेळगाव येथील गांधी भवन येथे जाहीर जनजागृती सभा होईल. त्याकरिता सरदार मैदानावर वाहनांच्या पार्किंगला अनुमती दिली जावी. जनजागृती व सभेच्या अनुषंगाने कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक, कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते क्रांतिवीर संगोळी रायण्णा चौक
आणि कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते श्री कृष्णदेवराय सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाईल. त्याचप्रमाणे गांधी भवन येथून कॉलेज रोड कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले जाईल अशा आशयाचा
तपशील पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. सदर निवेदनाच्या प्रती बेळगाव जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देखील सादर करण्यात आल्या आहेत.