बेळगाव लाईव्ह : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ९ डिसेंबरपासून बेळगावमधील सुवर्णविधानसौध येथे सुरू होणार आहे. हे अधिवेशन नेहमीप्रमाणे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर निवास, वाहतूक, आणि भोजनाच्या व्यवस्थेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने, शनिवारी (२३ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध उपसमिती अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, भोजन व्यवस्था योग्यप्रकारे करण्यासाठी आधीच आदेश देण्यात यावेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांच्या पथकांची आणि रुग्णवाहिकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
सुवर्ण विधानसौधच्या आत चहापान आणि अल्पोपहारासाठी विविध प्रकारच्या सुविधा पावत्यांच्या आधारे उपलब्ध कराव्यात, तसेच निदर्शने आणि सुरक्षा व्यवस्थापनासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील तसेच शहरात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करून ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असा आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवास, वाहतूक, भोजन व इतर सोयींसाठी दहा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मागील वेळप्रमाणे, विविध ठिकाणी भोजनाची सोय केली जाईल.
अधिवेशनाच्या काळात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हायस्पीड इंटरनेट, संगणक आणि लेखन सामग्रीची व्यवस्था केली जात आहे. तसेच, अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी पास उपलब्ध करून देण्यात येतील. सुवर्ण विधानसौधच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत नागरिकांना मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जाईल., असे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ६,००० पोलिसांच्या माध्यमातून कडेकोट सुरक्षा पुरवली जाईल. सुवर्णसौध परिसरातील निदर्शनाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करण्यात येईल.पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी अधिवेशनाच्या काळात पोलिसांसाठी निवास आणि भोजनाची विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, महापालिका आयुक्त शुभा, जिल्हा पंचायत मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, काडा प्रशासक सतीशकुमार, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सोबर्द, जिल्हा नगरविकास कोष योजनाधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, अन्न विभाग उपसंचालक मल्लिकार्जुन नायक आणि इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.